
जळगाव लाईव्ह न्यूज । जर तुम्ही दहावी, बारावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी भारतीय तटरक्षक दलात सामील होण्याची संधी आहे.भारतीय तटरक्षक दलाने ‘कोस्ट गार्ड एनरोल्ड पर्सनल टेस्ट (CGEPT) २०२६’ अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेत एकूण ३६५ रिक्त पदे भरली जाणार आहे. Indian Coast Guard Recruitment 2026
या भरतीमध्ये नाविक (GD), नाविक (DB), यांत्रिक आणि हायजिनिस्ट-I या पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ६ ऑक्टोबर २०२६ रोजीपासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० आहे. या भरतीसाठी अर्ज एसएससीच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे स्वीकारले जातील. Indian Coast Guard Bharti 2026
कोणत्या पदांवर किती जागा?
CGEPT-01/27 बॅच अंतर्गत नाविक (GD)ची १३० पदे, यांत्रिक (मेकॅनिकल) २८, यांत्रिक (इलेक्ट्रिकल) २३ आणि यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) ९ पदे आहेत. तर CGEPT-02/27 बॅच अंतर्गत नाविक (GD)ची १३०, नाविक (DB)ची २५ आणि हायजिनिस्ट-Iची २० पदे भरली जाणार आहेत. अशा प्रकारे एकूण ३६५ रिक्त जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता काय?
नाविक (GD) पदासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, बारावीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र विषय असणे गरजेचे आहे.
नाविक (DB) पदासाठी केवळ दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी आहे.
यांत्रिक पदासाठी दहावी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) अभियांत्रिकीमधील ३ किंवा ४ वर्षांचा डिप्लोमा आवश्यक आहे. तसेच दहावी-बारावी उत्तीर्ण असून संबंधित शाखेतील २ किंवा ३ वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा असलेले उमेदवारही पात्र आहेत.
हायजिनिस्ट-I पदासाठी दहावी उत्तीर्ण किंवा ITI पात्रता आवश्यक आहे.
वयोमर्यादा
नाविक (GD) पदासाठी उमेदवाराची जन्मतारीख १ नोव्हेंबर २००५ ते १ मे २००९ दरम्यान असावी. नाविक (DB)साठी १ नोव्हेंबर २००५ ते १ ऑक्टोबर २००९ दरम्यान जन्मलेले उमेदवार पात्र आहेत. यांत्रिक पदासाठी जन्मतारीख १ मे २००५ ते १ मे २००९, तर हायजिनिस्ट-I पदासाठी १ नोव्हेंबर २००२ ते १ ऑक्टोबर २००९ दरम्यान असणे आवश्यक आहे.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे. SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC उमेदवारांना ३ वर्षांची सवलत देण्यात येईल.
संपूर्ण भारतात नोकरीची संधी
या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नियुक्ती मिळू शकते. त्यामुळे भारतीय तटरक्षक दलात करिअर करण्याची इच्छा असलेल्या दहावी, बारावी आणि संबंधित डिप्लोमा पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.
अर्ज शुल्क किती?
सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५५० रुपये आहे. तर SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीतील पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी काळजीपूर्वक तपासून अर्ज करावा.





