जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातून आजपासून मान्सूनच्या परतीचा प्रवास; आगामी दिवस कसे राहणार हवामान?

जळगाव लाईव्ह न्यूज । परतीचा मान्सून पाऊस हजेरी लावेल अशी अपेक्षा असतानाच मान्सूनने जळगावसह उत्तर महाराष्ट्रातून माघारीचा प्रवास सुरू केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) विथड्रॉवल मॅपनुसार, ५ ऑक्टोबरपर्यंत जळगावातून मान्सूनची पूर्ण माघार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याचा उत्तर महाराष्ट्रातील अधिकृत प्रवास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

प्रत्यक्षात जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने यापूर्वीच उघडीप दिली आहे. मात्र, हवामान विभागाच्या तांत्रिक निकष आणि निर्धारित प्रक्रियेनुसार मान्सूनची अधिकृत माघार निश्चित केली जाते. ३ ऑक्टोबरपर्यंत मान्सूनची माघार मध्य भारतातील काही भागांपर्यंत नोंदवली गेली असून, आता उत्तर महाराष्ट्रातूनही माघारीची रेषा पुढे सरकणार आहे.

५ ऑक्टोबर ही उत्तर महाराष्ट्रातून मान्सूनच्या माघारीची सर्वसाधारण तारीख मानली जाते. त्यामुळे याच कालावधीत जळगावातून मान्सून पूर्णपणे माघार घेण्याचे संकेत हवामान विभागाच्या नकाशातून मिळत आहेत.

पुढील दिवस कसे राहणार हवामान?

मान्सूनच्या माघारीनंतर जळगाव जिल्ह्यात पुढील आठवडाभर आकाश मुख्यतः निरभ्र आणि हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पावसाची शक्यता कमी आहे.

दरम्यान, एकीकडे पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्यानंतर जळगावकरांना तीव्र उन्हाचा आणि घामाच्या धारांचा सामना करावा लागत आहे. जळगावचे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून, या वाढलेल्या पाऱ्यामुळे उन्हाचा चटका जाणवत आहे. दिवसभर उन्हाचा चटका जाणवत असतानाच रात्री मात्र हवेत गारवा वाढत असून, काहीशी बोचरी थंडी जाणवत आहे. त्यामुळे जळगावकरांना सध्या दिवसा कडक ऊन आणि रात्री गारठा, अशा दुहेरी हवामानाचा अनुभव येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button