
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी एकाचवेळी धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवाईत १३७ गुन्हे दाखल करून १३७ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत तब्बल ३१ लाख ९५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत अवैध दारू निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. कारवाईदरम्यान दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, रसायने, साहित्य तसेच तयार करण्यात आलेली अवैध दारू जप्त करण्यात आली.
अवैध हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त करून तेथील साहित्य व कच्चा माल नष्ट करण्यात आला. तसेच संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. अवैध दारू निर्मिती व विक्रीला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.
कारवाईची ठळक आकडेवारी
विशेष मोहिमेदरम्यान एकूण १३७ दाखल गुन्हे करण्यात आले असून १३७ आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४०६६ लिटर गावठी दारू, ४७६.९६ लिटर रसायन, तसेच २३७ नग विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत ३१,९५,३६० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
तसेच जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात २५२२ आरोपींविरुद्ध एकूण २५०६ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अवैध दारू निर्मिती, विक्री अथवा वाहतूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागरिकांनी अवैध दारूसंदर्भातील माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव विभागातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा तसेच संबंधित अधिकारी व अंमलदार यांनी विशेष सहभाग नोंदवला.





