
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या पाळधी येथून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. शाळा सुटल्यानंतर बस पकडताना पाय घसरून बसखाली आल्याने एका शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. राजनंदिनी श्रीराम शिंदे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे पाळधीसह परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना कशी घडली?
मयत राजनंदिनी शिंदे ही पाळधी येथील झंवर विद्यालयाची विद्यार्थिनी होती. शाळा सुटल्यानंतर ती नेहमीप्रमाणे आपाल्या गावाकडे जाण्यासाठी बस स्थानकावर आली. यावेळी घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची बस पकडण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. याच प्रचंड गर्दीत बसमध्ये चढत असताना राजनंदिनी हिचा तोल गेला आणि तिचा पाय अचानक सटकला. आणि ती थेट बसखाली आली. या दुर्घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला.
एका होतकरू विद्यार्थिनीचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. शाळा सुटण्याच्या वेळेस होणारी प्रचंड गर्दी आणि नियमित बसेसची अपुरी पडणारी क्षमता यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा सुटण्याच्या वेळी स्वतंत्र बसेस सोडण्यात याव्यात, अशी ठाम मागणी केली आहे.





