जळगाव जिल्हारेल्वे

नाशिक-भुसावळ रेल्वेमार्गावर ३० सप्टेंबरला ब्लॉक; ‘या’ गाड्या रद्द, अनेक गाड्यांच्या मार्गात बदल

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ-नाशिक रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून इगतपुरी-भुसावळ मार्गावरील कसबे सुकेणे आणि खेरवाडी स्थानकांवर यार्ड पुनर्रचनेचे काम हाती घेण्यात येणार असून या कामासाठी ३० सप्टेंबर रोजी नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून, काही मेमू आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

६ मेमू गाड्या रद्द

३० सप्टेंबर रोजी सहा मेमू गाड्यांचे परिचालन रद्द करण्यात आले आहे. यामध्ये देवळाली-भुसावळ ११११३ मेमू, भुसावळ-देवळाली ११११४ मेमू, इगतपुरी-भुसावळ ११११९ मेमू, भुसावळ-इगतपुरी १११२० मेमू, बडनेरा-नाशिक ६११३० मेमू आणि नाशिक-बडनेरा ६११२९ मेमूचा समावेश आहे. या सर्व गाड्या त्यांच्या संबंधित प्रारंभिक स्थानकांवरून रद्द करण्यात आल्या आहेत.

जनशताब्दीचा प्रवास मनमाडपर्यंतच

नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉकचा परिणाम जनशताब्दी एक्स्प्रेसवरही होणार आहे. ३० सप्टेंबर रोजी हिंगोली डेक्कनहून सुटणारी १२०७२ हिंगोली डेक्कन-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाड येथेच थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे मनमाड ते मुंबईदरम्यानचा तिचा प्रवास रद्द राहील.

तसेच १२०७१ मुंबई-हिंगोली डेक्कन जनशताब्दी एक्स्प्रेस मुंबईऐवजी मनमाडहून नियोजित वेळेनुसार सुटणार आहे. परिणामी मुंबई ते मनमाडदरम्यानची सेवा रद्द राहणार आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले

यार्ड पुनर्रचना कामामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना पर्यायी मार्गाने धावावे लागणार आहे. धनबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या गाड्या अंकाई, दौंड कॉर्ड लाईन, पुणे आणि लोणावळा मार्गे चालविण्यात येणार आहेत. याशिवाय ३० सप्टेंबर रोजी मुंबई-लखनौ एक्स्प्रेस लोणावळा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन आणि अंकाई मार्गे लखनौकडे रवाना होणार आहे.

७ गाड्या मार्गात नियंत्रित

३० सप्टेंबर रोजी सात गाड्यांना त्यांच्या मार्गावर ठरावीक कालावधीसाठी नियंत्रित करण्यात येणार आहे. यामध्ये पाटलीपुत्र-एलटीटी एक्स्प्रेस, प्रयागराज-एलटीटी एक्स्प्रेस, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस, भागलपूर-एलटीटी एक्स्प्रेस, एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस, मुंबई-आसनसोल एक्स्प्रेस आणि एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचा समावेश आहे.

काही गाड्या भुसावळ-निफाडदरम्यान तर काही इगतपुरी-नाशिकदरम्यान नियंत्रित केल्या जाणार आहेत. या नियंत्रणाचा कालावधी साधारण एक तासापासून तीन तासांपर्यंत राहणार आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेची तयारी

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे परिचालन अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी पायाभूत सुविधांची क्षमता वाढविण्याचे काम करण्यात येत आहे.

रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, यार्ड पुनर्रचना आणि इतर तांत्रिक कामांसाठी नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक आवश्यक आहे. या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांनी ३० सप्टेंबरच्या प्रवासापूर्वी आपल्या गाडीचे वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button