पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे

सप्टेंबर 27, 2026 1:04 PM

पितरांचे स्मरण आणि देवदर्शन हे परस्परविरोधी नाही; गैरसमज टाळण्याचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज : यंदा २९ ऑक्टोबर रोजी अंगारकी चतुर्थी असून, ही तिथी पितृपक्षाच्या कालावधीत येत असल्याने काही भाविकांमध्ये मंदिरात जावे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र पितृपक्ष सुरू असल्यामुळे देवदर्शन करू नये, असा सार्वत्रिक धार्मिक नियम नाही. त्यामुळे कोणत्याही गैरसमजामुळे भाविकांनी श्री मंगळ ग्रह मंदिरातील दर्शन टाळू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

IMG 20260927 WA0001

पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांचे स्मरण, कृतज्ञता आणि त्यांच्या आत्मकल्याणासाठी श्रद्धेने विधी करण्याचा काळ मानला जातो. त्याचवेळी अंगारकी चतुर्थी ही श्री गणेशभक्तांसाठी अत्यंत श्रद्धेची तिथी आहे. पितरांचे स्मरण करणे आणि देवदर्शन घेणे या दोन स्वतंत्र धार्मिक श्रद्धा असून, त्यांच्यात विरोधाभास मानण्याचे कारण नाही.

अमळनेरचे श्री मंगळ ग्रह मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून प्रत्येक अंगारकी चतुर्थीला येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यंदा अंगारकी चतुर्थी पितृपक्षात येत असल्याने काही भाविकांनी पितृपक्षातील रूढ समजुतींमुळे मंदिरात जाणे टाळू नये. श्रद्धा ही भीतीवर नव्हे, तर सद्भावना, कृतज्ञता आणि सकारात्मक विचारांवर आधारित असावी, असा संदेश यानिमित्ताने देण्यात येत आहे.

पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावाने दान, अन्नदान अथवा धार्मिक विधी करणे आणि त्यानंतर अथवा त्याच काळात मंदिरात जाऊन देवदर्शन घेणे—यामध्ये धार्मिकदृष्ट्या परस्परविरोध असणे आवश्यक नाही. प्रत्येक कुटुंबाच्या परंपरा आणि श्रद्धांचा आदर राखून भाविकांनी आपापल्या श्रद्धेनुसार धार्मिक आचरण करावे.

“पितरांचे स्मरण करूया, देवाचे दर्शन घेऊया आणि अंधश्रद्धेपेक्षा श्रद्धेला विवेकाची जोड देऊया,” असा संदेश यंदाच्या अंगारकी चतुर्थीनिमित्त देण्यात येत आहे.
अंगारकी चतुर्थीच्या दिवशी श्री मंगळ ग्रह मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून दर्शन व्यवस्था, शिस्त आणि भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. भाविकांनी शांतता, संयम आणि शिस्त पाळत दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now