अमळनेरच्या मंगळग्रह मंदिरात भक्तीचा जागर; श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

सप्टेंबर 24, 2026 4:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भाद्रपद शुद्ध दशमीनिमित्त अमळनेर येथील प्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिरात २१ सप्टेंबर रोजी श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. श्री मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आयोजित या महोत्सवाची सुरुवात पहाटे ४ वाजता जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते श्री मंगळग्रह देवांच्या मूर्तीवर विशेष पंचामृत अभिषेकाने झाली.

mangalgrah

पहाटेपासून सुरू झालेल्या ‘मंगल’ महाजागरामुळे मंदिर परिसरात दिवसभर धार्मिक आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. विविध अभिषेक, ध्वजपूजन, महाआरती, ५६ भोग, महाभोमयाग, पालखी मिरवणूक आणि महाधुपारती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी जन्मोत्सवाची रंगत वाढली.

सकाळी ६ वाजता दरवर्षीच्या परंपरेनुसार ध्वजाचे मानकरी योगेश पांडव यांनी परिवारासह वाद्यवृंदाच्या गजरात नवीन ध्वज मंदिरात आणला. जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पांडव दाम्पत्याचे स्वागत केले. जिल्हाधिकारी घुगे यांच्या हस्ते ध्वजाचे तसेच मानकरी दांपत्याचे औक्षण करण्यात आले. संबळ वादन आणि भेरच्या निनादात मंदिराचे जुने ध्वज उतरवून नवीन ध्वज फडकवण्यात आले, ज्याला मंदिराच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या माजी सैनिकांनी मानवंदना दिली.

सकाळी साडेसहाच्या सुमारास फुलांनी सजवलेल्या पाळण्यात श्री मंगळग्रह देवांचा प्रतिकात्मक जन्मोत्सव साजरा करण्यात आला, ज्यामध्ये उपस्थित भाविकांनी सामूहिकरित्या पाळणा गात देवांचे दर्शन घेतले. मंदिराच्या ओट्यावर सजवण्यात आलेल्या पाळण्याभोवती देशी-विदेशी फुलांची आकर्षक मयूरपंखी सजावट करण्यात आली होती. ऑर्किड, सनफ्लॉवर, जर्बेरा, गुलाब, शेवंती, निशिगंधा, लिलियम, कॅला लिली, झेंडू, ट्युलिप, डॅफोडिल्स, अँथुरियम यांसह विविध फुले आणि पानांचा वापर करण्यात आला होता. या सजावटीने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

यंदाच्या जन्मोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते ५६ विविध फळांचा नैवेद्य. निर्गुण फूल भांडारचे संचालक वाल्मीक पाटील यांनी देशी-विदेशी अशा ५६ प्रकारच्या फळांचा नैवेद्य अर्पण केला. यामध्ये आंबा, पपई, जांभूळ, सफरचंद, संत्री, अननस, द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, फणस, अंजीर, स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी, किवी, ड्रॅगनफ्रूट, एवोकॅडो, लिची, मंगोस्टीन यांसह विविध फळांचा समावेश होता. विविध खाद्यपदार्थांचा ५६ भोग अर्पण करण्याची परंपरा असतानाच यंदापासून ५६ विविध फळांचा नैवेद्य अर्पण करण्याची नवीन परंपरा सुरू करण्यात आली.

महाभोमयाग आणि भव्य पालखी मिरवणूक
दुपारी १ वाजता रेती, शेती आणि मातीशी संबंधित समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी ‘श्री महाभोमयागाचे’ आयोजन करण्यात आले. या यागात आमदार चंद्रकांत सोनवणे व त्यांच्या पत्नी लताताई सोनवणे, तहसीलदार डॉ. उमाताई ढेकळे, व्यावसायिक प्रवीण नाना पाटील व त्यांची पत्नी कविताताई पाटील तसेच संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर व त्यांच्या पत्नीने सहभाग घेतला.

सायंकावी ५ वाजता वाद्यवृंदाच्या गजरात श्री मंगळग्रह देवांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली, ज्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता झालेल्या भव्य महाधुपारतीने दिवसभर चाललेल्या ‘मंगल’ महाजागराची सांगता झाली. मंदिरात उपस्थित राहू शकले नाही अशा जगभरातील भाविकांसाठी मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सोशल मीडियावरून या सर्व धार्मिक विधींचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now