गिरणा धरण सलग तिसऱ्यांदा 100 टक्के भरले; 175 गावांचा वर्षभराचा पाणीप्रश्न मिटला!

सप्टेंबर 16, 2026 12:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव जाणवत असतानाही जळगाव जिल्ह्यासाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या गिरणा धरणाने यंदा पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेचा टप्पा गाठला आहे. १५ सप्टेंबर रोजी सलग तिसऱ्यांदा गिरणा धरण १०० टक्के भरले असून, मुबलक जलसाठ्यामुळे जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील १७५ गावांचा पुढील वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटला असून शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

girna dam

धरण १०० टक्के भरल्यानंतर प्रशासनाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. आज बुधवारी सकाळी ६ वाजता गिरणा धरणाचा एक वक्रद्वार ३० सेंटीमीटरने उघडण्यात आला. त्यातून सध्या १,२३८ क्युसेक म्हणजेच ३५.०३ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सुरू आहे. प्रकल्पातून पीएलबीसी कालव्याद्वारे सध्या कोणताही विसर्ग सुरू नसून कालवा बंद आहे. तसेच सिंचनासाठीही विसर्ग शून्य आहे.

गिरणा मुख्य प्रकल्पाची पूर्ण जलाशय पातळी ३९८.०७ मीटर इतकी आहे. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता गिरणा प्रकल्पातील सद्य जलपातळी ही ३९८.०७ मीटर इतकी नोंदविण्यात आली. त्यामुळे गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. प्रकल्पातील एकूण साठा ६०८.४५ दशलक्ष घनमीटर असून, त्यापैकी ५२३.५५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा आहे. एकूण जलसाठ्याची टक्केवारी १०० टक्के इतकी झाली आहे.

५६ वर्षांत केवळ १४ वेळा पूर्ण क्षमतेने भरले

गिरणा प्रकल्पाच्या इतिहासाकडे पाहता धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची घटना फारशी नियमित नाही. तब्बल ५६ वर्षांच्या इतिहासात गिरणा धरण केवळ १४ वेळा १०० टक्के भरले आहे. विशेष म्हणजे गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत तब्बल सात वेळा धरणाने पूर्ण क्षमतेचा टप्पा गाठला आहे. यंदाही सलग तिसऱ्यांदा धरण पूर्ण भरल्याने गिरणा प्रकल्पाच्या जलसाठ्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.

धरणात मुबलक जलसाठा झाल्यामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल आणि धरणगाव या तालुक्यांमधील ५२ हजार हेक्टर सिंचन क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे. यंदा हिवाळा आणि आगामी उन्हाळ्यासाठी रब्बी पिकांना एकूण ५ आवर्तने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच १७५ गावांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता पुढील वर्षभरासाठी दूर झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now