जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । खाकी वर्दी घालायची आणि देशाची सेवा करायची, असे स्वप्न बाळगून पोलीस भरतीची जय्यत तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक गुडन्यूज आहे. राज्यातील जून २०२७ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस अंमलदारांच्या पदांची माहिती गृह विभागाने मागवली आहे. या प्रक्रियेनुसार राज्यात जवळपास ८१०० पोलिसांची भरती केली जाण्याची शक्यता आहे.

खरंतर राज्यात पोलीस दलातील मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. जून २०२७ पर्यंत कोणकोणती पदे रिक्त होणार आहेत, याची माहिती संबंधित विभागांकडून मागवण्यात आली आहे. त्यानंतर उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार भरती प्रक्रियेचे नियोजन केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रस्तावित पोलीस भरतीसाठी १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत अर्ज प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यानंतर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ८१०० पदांवर भरती होण्याची शक्यता आहे.
म्हणजेच पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांकडे तयारीसाठी आता काही महिने उपलब्ध आहेत. त्यामुळे इच्छुक तरुण-तरुणींनी मैदानी चाचणी, लेखी परीक्षा तसेच आवश्यक शारीरिक तयारीला आतापासूनच सुरुवात करण्याचा सल्ला दिला जात आहे.
विशेष यावर्षी राज्यात तब्बल १५ हजार ६३१ पोलिसांची भरती झाली आहे. त्यानंतर आता आगामी वर्षासाठीही मोठ्या भरतीची तयारी सुरू झाली आहे.











