Parola : दागिन्यांच्या लालसेतून मावशीचा खून; ४० दिवसांनंतर हत्येचा उलगडा, भाच्याला अटक

सप्टेंबर 14, 2026 10:39 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । पारोळा तालुक्यातील करंजी बु. येथून ४० दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या ८५ वर्षीय वैजंताबाई गणपत माळी यांच्या हत्येचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) उलगडा केला आहे. दागिन्यांच्या लालसेपोटी सख्ख्या भाच्यानेच मावशीचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. प्रशांत उत्तम माळी (४०, रा. मुकटी, ता. जि. धुळे) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

vaijantamali

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजंताबाई या ३ ऑगस्ट रोजी सकाळी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. याप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी पारोळा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली होती. त्यांच्या अंगावर सोन्या-चांदीचे दागिने असल्याने पोलिसांना घातपाताचा संशय होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी LCB ला समांतर तपासाचे आदेश दिले.

LCB ने दोन पथके तयार करून पारोळा, धुळे, अमळनेर, धरणगाव, मुक्ताईनगर, यावल आणि जळगाव परिसरात तपास केला. सुमारे २५० किलोमीटर परिसरात शोधमोहीम राबवून १५० सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात ३ ऑगस्ट रोजी सकाळी प्रशांत माळी हा वैजंताबाई यांच्यासोबत दिसून आला. त्यानंतर त्या कारमधून जाताना दिसल्याने त्याच्यावरील संशय बळावला.

तब्बल ४० दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी प्रशांतला ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, मोठ्या कर्जामुळे त्रस्त असलेल्या प्रशांतने दागिन्यांच्या मोहापोटी हा कट रचला. ‘शिरसोली येथे नातेवाईकाचा मृत्यू झाला आहे’, असे खोटे सांगून त्याने वैजंताबाईंना कारमध्ये बसवले. त्यानंतर धरणगाव, अमळनेर, धुळे परिसरात फिरवून दागिन्यांची मागणी केली.

४ ऑगस्टच्या पहाटे धुळे येथील नंदाळे फाट्याजवळ महामार्गावर त्याने रुमालाने गळा आवळून वैजंताबाईंची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून दुसऱ्या दिवशी कानळदा फाट्याजवळील सिमेंटच्या चारीत फेकून दिला. आरोपीच्या जबाबानंतर पोलिसांनी कानळदा फाट्याजवळून वैजंताबाई यांचा मृतदेह हस्तगत केला. आरोपीने काही दागिने धरणगाव, अमळनेर व धुळे येथील सोनारांना विकल्याचे सांगितले असून, उर्वरित दागिने फागणे परिसरात लपविल्याची माहिती दिली आहे. मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे. या प्रकरणात सुरुवातीला BNS कलम १३७ (२) व १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता खून व पुरावा नष्ट करण्यासंदर्भातील कलमांची वाढ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now