जळगाव लाईव्ह न्यूज । गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात होण्यापूर्वीच जळगाव शहरातील नवी पेठेतील जय महाराष्ट्र मित्र मंडळाला मोठा धक्का बसला. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे ४७ हजार रुपयात बुक करून आणलेली बाप्पाची १२ फुटी मूर्ती प्रतिष्ठापनेपूर्वीच खंडित झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूर्तिकाराने पूर्ण रक्कम घेतल्यानंतरही मूर्तीचे काम व्यवस्थित पूर्ण केले नसून, घाईघाईने ओली मूर्ती मंडळाच्या ताब्यात दिल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला असून मंडळावर स्थापनेपूर्वीच विसर्जनाची वेळ आली.

यंदाचा गणेशोत्सव अत्यंत दिमाखात साजरा करण्यासाठी जळगावातील नवी पेठेतील ‘जय महाराष्ट्र मित्र मंडळा’ने तब्बल सहा महिन्यांपूर्वीच बऱ्हाणपूर येथील मूर्तिकाराकडे१२ फूट उंचीची गणेशमूर्तीची नोंदणी (बुकिंग) केली होती. त्यासाठी मंडळाने मूर्तिकाराला सुमारे ४७ हजार रुपये दिल्याचे सांगण्यात आले. ठरल्याप्रमाणे मूर्ती तयार झाल्यानंतर ती जळगावकडे आणण्यात आली. मात्र, मूर्तीभोवती आवरण (कापड) झाकलेले असल्यामुळे प्रवासात ती दुभंगल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले नाही.

जळगावात आणल्यानंतर मंडपात मूर्ती बसवण्याची आणि त्यावर रंगकाम व साज चढवण्याची तयारी सुरू होती. याच दरम्यान कार्यकर्त्यांच्या लक्षात आले की, मूर्ती अजूनही आतून ओलीच असून ती कमकुवत झाल्यामुळे खंडित होत आहे. पाहता पाहता मूर्तीचा काही भाग स्वतःहून तुटू लागला. हे दृश्य पाहून उपस्थितांना मोठा धक्का बसला. मूर्तिकाराच्या हलगर्जीपणामुळे ही वेळ ओढवल्याचे सांगण्यात येत आहे.
खंडित किंवा ओल्या अवस्थेतील मूर्तीची प्रतिष्ठापना करणे धार्मिकदृष्ट्या अयोग्य आणि अशक्य होते. त्यामुळे मंडळाचे अध्यक्ष भूषण जोशी आणि सर्व कार्यकर्त्यांनी मूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. या प्रकारची माहिती तत्काळ पोलिसांनाही देण्यात आली.
यानंतर आज शुक्रवारी क्रेनच्या सहाय्याने ही गणेशमूर्ती मेहरुण तलावापर्यंत नेण्यात आली. बाप्पाच्या आगमनापूर्वीच अशा प्रकारे त्याला निरोप द्यावा लागल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मूर्तिकाराच्या या अपरिपक्व आणि बेजबाबदार कारभारामुळे मंडळाची आर्थिक फसवणूक तर झालीच आहे, शिवाय गणेशभक्तांच्या भावनाही दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे संबंधित मूर्तिकारावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मंडळातील कार्यकर्त्यांकडून होत आहे.











