जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या अनेक दिवसापासून दडी मारलेल्या पावसाबाबत दिलासादायक बातमी समोर आलीय. मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेष यात जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहे.

१२ सप्टेंबरला जळगावमध्ये वादळी पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे आणि कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १२ सप्टेंबर रोजी जळगावसह नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी हवामानातील बदलांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जळगावमध्ये १३ सप्टेंबरलाही पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना या अंदाजामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

नाशिक घाटाला पुन्हा ‘यलो अलर्ट’
११ सप्टेंबर रोजी नाशिकच्या घाट परिसरासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागात पावसासोबतच वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. याच दिवशी परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांनाही ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
यानंतर १३ सप्टेंबर रोजी नाशिकसह कोकण, पुणे, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. तर १४ सप्टेंबर रोजी नाशिक घाट परिसराला पुन्हा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरीचाही त्यात समावेश आहे.
नंदुरबारला मात्र अलर्ट नाही
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज असला तरी नंदुरबार जिल्ह्याचा या कालावधीतील ‘यलो अलर्ट’च्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. दरम्यान, पावसाने दडी मारल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत शेतीची कामे प्रभावित झाली आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत होणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.







