जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील ढोर बाजार परिसरातील इलेक्ट्रिक दुकानाचे शटर वाकवून तसेच कुलूप तोडून चोरी करणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 60 हजार रुपये किमतीची तांब्याची तार आणि गुन्ह्यात वापरलेली 30 हजारांची मोटारसायकल, असा एकूण 90 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 ते 4 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजेदरम्यान ढोर बाजारातील ‘मातोश्री’ नावाच्या इलेक्ट्रिक दुकानात चोरी झाली होती. अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर वाकवून आणि कुलूप तोडून दुकानातील सुमारे 40 किलो तांब्याची नवीन तार तसेच मोटार चटई लूमसाठी व रिपेअरिंगसाठी लागणारे साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले. तसेच तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हर्षल गोपाल परदेशी (22, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव), कमलेश सुरेश पवार (21, रा. कुसुंबा) आणि रितेश निवृत्ती साळुंखे (21, रा. कुसुंबा) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींकडे कौशल्यपूर्ण व सखोल चौकशी केली असता त्यांनी दुकानात चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून 60 हजार रुपये किमतीची 40 किलो नवीन व जुनी तांब्याची तार तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली 30 हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुंडलीक धनके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश चौधरी, प्रमोद लाडवंजारी, रामकृष्ण पाटील, किरण चौधरी, गिरीश दिलीप पाटील, मोतीलाल बोरसे, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, राहुल घेटे, किरण पाटील, गणेश ठाकरे, ललित नारखेडे, पोलीस अंमलदार शशिकांत मराठे आणि रमाकांत साळुंखे यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी बजावली.










