जळगावातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा! कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

सप्टेंबर 11, 2026 4:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ अंतर्गत शेतकऱ्यांची दुसरी यादी आज शुक्रवारी, 11 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत जळगाव जिल्ह्यातील तब्बल 7 हजार 316 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

farmer

शासनाच्या 2 जून 2026 रोजीच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयानुसार ही योजना राबविण्यात येत आहे. यापूर्वी या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. आता दुसरी यादी जाहीर झाल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 5,399 शेतकरी

जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीमध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 5,399 शेतकऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत बँकांमधील 1,917 शेतकऱ्यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील एकूण 7,316 शेतकरी दुसऱ्या यादीत पात्र ठरले आहेत.

दरम्यान, या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असलेल्या इतर शेतकऱ्यांच्या याद्याही आगामी काळात टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे अद्याप यादीत नाव नसलेल्या पात्र शेतकऱ्यांनी पुढील याद्यांकडे लक्ष ठेवावे.

यादी कुठे पाहता येणार?

शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये तसेच बँकांच्या सर्व शाखांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यादीत नाव समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण तात्काळ पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था महेशकुमार गायकवाड यांनी संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया विलंब न करता पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. दुसऱ्या यादीत हजारो शेतकऱ्यांचा समावेश झाल्याने कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now