Parola : जुन्या भांडणातून चाकू भोसकून तरुणाची हत्या; संशयित आरोपीला अटक

सप्टेंबर 11, 2026 8:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या पारोळा तालुक्यातील पळसखेडे बुद्रुक शिवारात जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका २४ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मयूर दुर्वास पाटील असं खून झालेल्या तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणी पारोळा पोलिसांनी तत्परता दाखवत फरार संशयित आरोपी अंकुश नेहरू पाटील याच्या आज पहाटे मुसक्या आवळल्या आहेत.

Chopper murder

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी (१० सप्टेंबर) दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास पळसखेडे बु. शिवारातील रवींद्र सुकदेव पाटील यांच्या शेताजवळ ही घटना घडली. मयूर पाटील आणि संशयित आरोपी अंकुश पाटील यांच्यात यापूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात असल्याने दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

वाद वाढल्यानंतर अंकुश पाटील याने त्याच्या पॅन्टच्या डाव्या खिशातून चाकू काढून मयूर पाटील यांच्या पोटावर वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात मयूर यांना गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी नेण्यापूर्वीच किंवा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

या प्रकरणी मयूर यांचे वडील बाळू उर्फ दुर्वास भिका पाटील (वय ४५, रा. पळसखेडे बु., ता. पारोळा) यांनी पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घटनेनंतर संशयित आरोपी अंकुश पाटील फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असता शुक्रवारी पहाटे त्याला अटक करण्यात यश आले. अटकेनंतर पोलिसांकडून घटनेमागील नेमके कारण, हल्ल्याची परिस्थिती आणि इतर बाबींचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now