जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिकांवर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. पिकांना पावसाची गरज असताना शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. अशातच सोमवारी रावेर तालुक्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला.

दंगोडा ते मंगरूळ परिसरात काल सोमवारी दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान सुरू झालेला पाऊस तब्बल दोन तास जोरदार बरसला. या पावसामुळे परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले, तर शेतशिवारांमध्येही पाणी जमा झाल्याचे दिसून आले. सुमारे तीन किलोमीटरच्या परिसरात पावसाचा जोर अधिक होता.

दरम्यान, मंगरूळ धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्येही पावसाने जोर धरला. त्यामुळे धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकेत लक्षणीय वाढ झाली आहे. परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भोकर नदीच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होऊन नदीला पूर आला.
भोकर नदीला आलेला पूर पाहण्यासाठी बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील भोकरी गावाजवळील पुलावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी आपली वाहने पुलावर थांबवून नदीचा वाढलेला प्रवाह पाहण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे काही काळ या मार्गावर वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे चित्र होते.
दंगोडा, मंगरूळ यासह लगतच्या गावांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले. काही भागातील शेतशिवारांमध्येही पाणी शिरल्याने परिसर जलमय झाला. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यातील अनेक भाग अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत असताना रावेर तालुक्यात झालेल्या या दमदार पावसामुळे खरीप पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.









