आसोदा, भादलीसह ७ गावांतील १ हजार पेक्षा अधिक बैलजोड्यांना साजचे वाटप; शेतकरी बांधवांचा टोपी व उपरणे देऊन सन्मान
जळगाव लाईव्ह न्यूज । शेती हा केवळ व्यवसाय नसून आपल्या मातीशी आणि संस्कृतीशी जोडलेला वारसा आहे. यांत्रिकीकरणाच्या काळातही बैल हा शेतकऱ्याच्या कष्टातील खरा सोबती आहे. त्यामुळे बैलपोळा म्हणजे बळीराजाच्या कष्टाचा, त्याच्या सर्जा-राजाचा आणि आपल्या कृषी संस्कृतीचा सन्मान आहे. शेतकऱ्याची खरी दिवाळी ही बैल पोळाच असतो. बैल हा शेतकऱ्याचा सच्चा मित्र आहे. वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून तो राबतो. बैलपोळ्याच्या दिवशी त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आपली परंपरा आहे. आधुनिक यंत्रे आली तरी मातीशी नाळ जोडलेल्या शेतकऱ्यांनी ही संस्कृती आजही जपली आहे. हीच आपल्या ग्रामीण संस्कृतीची खरी श्रीमंती आहे असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर आसोदा परिसरातील शेतकरी बांधवांसाठी बैलसाज वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आसोदा, भादली, ममुराबाद, धामणगाव, नांद्रा खु., सुजदे व देऊळवाडे येथील शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांना साज देण्यात आला. तसेच त्यांच्या मालक असलेल्या शेतकरी बांधवांना रुमाल, टोपी व उपरणे देऊन सन्मानित करण्यात आले. आसोदा येथे ३५०, भादली येथे ३१०, ममुराबाद १७०, धामणगाव ६४, नांद्रा खुर्द ४५, सुजदे ७३ आणि देवलवाडी येथील ४३ अशा एकूण १ हजार पेक्षा जास्त बैलजोड्यांना साजाचे वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

परंपरेला सामाजिक बांधिलकीची जोड
आसोदा येथे गणपती मंदिर मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष नितीन ढाके, उपाध्यक्ष विनायक ढाके, सचिव रवींद्र सावदेकर यांचेसह मिलिंद चौधरी, प्रशासक मनोज चौधरी व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वागत केले. तर भादली येथे माजी पंचायत समिती सदस्य मिलींद चौधरी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
गणपती मंदिर मित्र मंडळाच्या सामाजिक कार्याचे तसेच भादली येथील मिलींद चौधरी यांच्या उपक्रमाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. गेल्या तीन वर्षांपासून आसोदा व भादली परिसरात बैलपोळ्यानिमित्त बैलजोड्यांना साज वाटपाचा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, शेतकरी व त्यांच्या पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या उपक्रमाचे पालकमंत्र्यांनी भरभरून कौतुक केले. सामाजिक कार्यकर्ते तुषार महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांकडून या उपक्रमाला मिळणाऱ्या योगदानाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
आसोदा व भादली परिसरात कोट्यावधींची विकासकामे; शेतरस्त्यांना प्राधान्य
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आसोदा व भादली या गावांसह परिसरात कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे सुरू आहेत. जळगाव तालुक्यातील गावांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात शेतरस्त्यांना प्राधान्य देण्यात आले असून, मोठ्या प्रमाणावर कामे मार्गी लागत आहेत. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासह शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी, यासाठी शेतरस्त्यांची कामे अधिक वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. “शेतकऱ्याच्या बैलाला साज देऊन त्याचा सन्मान करणे ही एका दिवसाची कृतज्ञता आहे; पण शेतरस्ते, पाणी आणि गावातील मूलभूत सुविधा निर्माण करून बळीराजाचे दैनंदिन कष्ट कमी करणे ही आपली कायमची जबाबदारी आहे,” असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी मित्र किशोर चौधरी व गोपाळ भारंबे यांनी केले. सूत्रसंचालन दिगंबर महाजन सर यांनी केले, तर सामाजिक कार्यकर्ते तुषार महाजन व मिलींद चौधरी यांनी आभार मानले.
यांची होती उपस्थिती
आसोदा येथे भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी, गणपती मंदिर मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन ढाके, उपाध्यक्ष विनायक ढाके, सचिव रविद्र सावदेकर, सामाजिक कार्यकर्ते तुषार महाजन, तालुका पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, मा.पं. समिती सदस्या ज्योतीताई महाजन ,सुभाष महाजन, गिरीष भोळे, किशोर चौधरी, डिगंबर महाजन, तर भादली येथे मा. पं. समिती सदस्य मिलींद चौधरी, गोपाळ भारंबे, ग्रा. पं. प्रशासक मनोज चौधरी, समाधान धनगर, वि. का. सो. चे किरण रडे, संदिप कोळी यांच्यासह आसोदा व भादली परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






