जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील प्रॉपर्टी संबंधी गुन्ह्यांना आळा घालण्यासह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर वचक निर्माण करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी “प्रतिबंधात्मक ऑपरेशन ३०५” ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत भंगार दुकाने, रेकॉर्डवरील आरोपी, संशयित वाहने तसेच अवैध धंद्यांची तपासणी करून कारवाई करण्यात आली.तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

या विशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी, संशयित वाहनांची तपासणी आणि भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. प्रॉपर्टी संबंधी गुन्ह्यांमध्ये चोरीचा मुद्देमाल विल्हेवाट लावण्याची शक्यता लक्षात घेऊन भंगार दुकाने व संशयित ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी १५७ भंगार दुकानांची तपासणी केली. तर २८१ रेकॉर्डवरील आरोपी आणि ७४२ संशयित वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करत ५ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून २३ नॉन-बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली.

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातही पोलिसांनी धडक मोहीम राबविली. दारूबंदी कायद्यांतर्गत ३६ केसेस दाखल करण्यात आल्या. या कारवाईमध्ये ७३८ लिटर गावठी दारू, ६२३० लिटर कच्चे रसायन तसेच १६४ देशी/विदेशी/बिअर बाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईची एकूण किंमत ४,७८,०४५ रुपये असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आर्म्स ॲक्ट आणि अवैध वाळू वाहतुकीवरही कारवाई
मोहिमेदरम्यान आर्म्स ॲक्टअंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला असून एका प्रकरणात एक कोयता जप्त करण्यात आला. तसेच अवैध वाळू वाहतुकीविरोधातही कारवाई करण्यात आली. यामध्ये एका प्रकरणात एक डंपर व १५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून जप्त मुद्देमालाची किंमत १० लाख ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती काळजी घ्यावी. कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा हालचाल निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलिसांना द्यावी, असे आवाहन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे. तसेच चोरीचा किंवा संशयास्पद स्वरूपाचा मुद्देमाल खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींविषयी पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अवैध धंदे, अमली पदार्थ, अवैध शस्त्रे तसेच अवैध वाळू वाहतुकीबाबतही नागरिकांनी पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव तसेच सर्व पोलीस स्टेशन / स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी बजावली.






