जळगाव लाईव्ह न्यूज । धावपळीच्या जीवनशैलीत आणि मोबाईलच्या युगात पालक व मुलांमधील संवाद वाढून कौटुंबिक नातेसंबंध अधिक घट्ट व्हावेत, या उद्देशाने रिफ्लेक्शन फाउंडेशनच्या ‘पालक शाळा’ उपक्रमांतर्गत ‘कुटुंब गणपती कार्यशाळा’ नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. रावेर व पारोळा येथे आयोजित या अनोख्या कार्यशाळेत मुलं आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

आजच्या वेगवान काळात आणि तंत्रज्ञानाच्या आक्रमणामुळे कुटुंबामधील परस्परांतील मोकळा आणि आनंदाचा वेळ कमी होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसते. प्रत्येक जण मोबाईलमध्ये गुंतल्याने पालक व मुलांमध्ये विसंवाद निर्माण होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी आणि मुलांसोबत पालकांनी काहीतरी नवनिर्मितीचा आनंद घ्यावा, या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात आई-वडील, आजोबा आणि भाऊ-बहीण या सर्वांनी एकत्र येत गणपतीची मूर्ती साकारण्याचा आनंद लुटला. या कार्यशाळेत प्रसिद्ध हस्तकला शिक्षक दत्तात्रय गंधे यांनी पालक आणि मुलांना पर्यावरणपूरक गणपती बनविण्याचे अत्यंत सोप्या पद्धतीचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेमंत भिडे, निलेश चौधरी, सौ. माणिक राव, शीतल पाटील, सचिन कोल्हे, डॉ. विशाखा पाटील आणि किरण तोडकरी यांनी विशेष परिश्रम घेतले.






