जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यामधील आमोदा शिवारातील शेतातून सुमारे ३० हजार रुपये किमतीची १५ क्विंटल केळी चोरी केल्याप्रकरणी फैजपूर पोलिसांनी मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे. लहू अशोक केदारे (रा. लुंबिनीनगर, बामणोद, ता. यावल) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीच्या केळीच्या विक्रीतून त्याच्या हिस्स्याला आलेली सुमारे १५ हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

फैजपूर येथील शेतकरी जितेंद्र दिनकर कोल्हे (वय ४५) यांनी मौजे आमोदा शिवारातील गट क्रमांक २०५ मधील केळीच्या शेतात चोरी झाल्याची फिर्याद दिली होती. अज्ञात चोरट्यांनी सुमारे ७० ते ८० केळीचे घड, एकूण १५ क्विंटल व अंदाजे ३० हजार रुपये किमतीची केळी चोरून नेली होती. फैजपूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच बँक खात्यांच्या व्यवहारांची माहिती तपासली. त्यातून लहू अशोक केदारे, अजय सुनील केदारे, शुभम विजय केदारे आणि सुरज मिलिंद मोरे (सर्व रा. लुंबिनीनगर, बामणोद, ता. यावल) यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
यातील मुख्य सूत्रधार लहू केदारे हा गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक तयार करण्यात आले. दरम्यान, लहू केदारे हा २७ ऑगस्ट रोजी फैजपूर शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला फैजपूर शहरातून ताब्यात घेत अटक केली.
आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेल्या केळीचे घड विक्री केल्याची माहिती दिली. त्याच्या हिस्स्याला आलेली १५ हजार रुपयांची रक्कम पोलिसांनी हस्तगत केली असून, या कारवाईमुळे केळी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक सदिप गावीत आणि फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक संतोष चौधरी, सहायक फौजदार मोती पवार, पोलिस हेड कॉन्स्टेबल विकास सोनवणे आणि पोलिस कॉन्स्टेबल राहुल महाजन यांच्या पथकाने केली.








