मालेगाव नजीक भीषण अपघात; ट्रक-एसटी बसच्या धडकेत जळगावातील दोन महिलांचा मृत्यू

ऑगस्ट 19, 2026 6:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील दहिवाळ शिवारात ट्रक आणि एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यातील दोन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर २३ प्रवासी जखमी झाले आहेत. इरशाद बी रमजान मणियार (वय ६०, रा. जामनेर) आणि सखुबाई किरण माळी (वय ६५, रा. एरंडोल) असं अपघातातील मृत महिलांची नाव आहे.

malegaonacd

नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव वसंत आगाराची नाशिक-पाचोरा ही बस (एमएच ४० वाय ५८२२) ४० पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जात होती. ही बस मालेगावहुन चाळीसगाव कडे जात असताना दहिवाळ शिवारात चाळीसगावकडून येणाऱ्या एका भरधाव ट्रक (क्रमांक एमएच १९ सीवाय ८५२५) शी तिची समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताची तीव्रता अत्यंत मोठी होती आणि बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ व आक्रोश पसरला.

या दुर्दैवी घटनेत जामनेरातील इरशाद बी रमजान मणियार आणि एरंडोल येथील सखुबाई माळी या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर घटनेत एकूण २३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना त्वरित मालेगाव येथील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले असून, यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

जखमींमध्ये प्रणिता विनोद ततार (४७), राजेन्द्र जगन्नाथ ततार (६३), आशा राजेन्द्र ततार (५७) तिघेही रा. संगमेश्वर, मालेगाव, ऋतुजा शुभम सोनजे (२४, नाशिक), अरमान नजीम पिंजारी (३५, सोयगाव), गोकुळ रामदास भामरे (६५), सुनंदा गोकुळ भामरे (६०) दोघेही रा. नाशिक, सुहाना अझीसा (१९), निधा अझीसा (६६) दोघीही रा. मालेगाव आणि रत्नाबाई नाना अहिरे (६०, टिंगरी, मालेगाव) यांचा समावेश आहे.

या अपघातामुळे मालेगाव-चाळीसगाव मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी मदतकार्य राबवत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now