वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी! नशिराबादसह ‘या’ टोलनाक्यावर आजपासून नवे दर लागू; पाहा सुधारित दरपत्रक

ऑगस्ट 12, 2026 11:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) जिल्ह्यातील सबगव्हाण आणि नशिराबाद टोल प्लाझावर आजपासून म्हणजेच १२ ऑगस्टपासून सुधारित पथकर दर लागू केले आहेत. वाहनांच्या प्रकारानुसार एकेरी प्रवास, परतीचा प्रवास आणि स्थानिक वाहनांसाठी मासिक पासचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

tollnaka

सबगव्हाण टोलवर वाहनानुसार किती टोल?

तरसोद ते फागणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सबगव्हाण टोल नाक्यावर कार, जीप, प्रवासी वाहने आणि हलक्या मोटार वाहनांसाठी एकेरी प्रवासाचा टोल १७० रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी २५० रुपये निश्चित करण्यात आला आहे. हलक्या व्यावसायिक वाहनांना एकेरी प्रवासासाठी २७० रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी ४०५ रुपये मोजावे लागतील. दोन धुरीच्या ट्रक आणि बससाठी एकेरी प्रवासाचा दर ५६५ रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी ८५० रुपये आहे.

तीन धुरीच्या व्यावसायिक वाहनांसाठी एकेरी प्रवासाचा टोल ६२० रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी ९३० रुपये राहणार आहे. चार ते सहा धुरीच्या जड वाहनांसाठी एकेरी प्रवासाला ८९० रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी १,३३३ रुपये आकारले जातील. सात किंवा त्यापेक्षा अधिक धुरीच्या अवजड वाहनांसाठी अनुक्रमे १,०८५ आणि १,६२५ रुपये टोल निश्चित करण्यात आला आहे.

नशिराबाद टोलचे दरही बदलले

तरसोद ते चिखली राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद टोल नाक्यावर कार, जीप, प्रवासी वाहने आणि हलक्या मोटार वाहनांसाठी एकेरी प्रवासाचा दर ११५ रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी १७० रुपये राहणार आहे. हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी एकेरी प्रवासाला १८५ रुपये आणि परतीच्या प्रवासाला २८० रुपये आकारले जातील. दोन धुरीच्या ट्रक आणि बससाठी हे दर अनुक्रमे ३९० रुपये आणि ५८० रुपये आहेत.

तीन धुरीच्या व्यावसायिक वाहनांसाठी एकेरी प्रवासाचा दर ४२५ रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी ६३५ रुपये आहे. चार ते सहा धुरीच्या जड वाहनांना एकेरी प्रवासासाठी ६१० रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी ९१० रुपये द्यावे लागतील. सात किंवा त्यापेक्षा अधिक धुरीच्या अवजड वाहनांसाठी एकेरी प्रवासाचा दर ७४० रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी १,११० रुपये निश्चित करण्यात आला आहे.

स्थानिक वाहनधारकांसाठी मासिक पास

दरम्यान, सबगव्हाण आणि नशिराबाद या दोन्ही टोलनाक्यांच्या २० किलोमीटर परिसरातील स्थानिक गैरव्यावसायिक वाहनधारकांसाठी मासिक पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वाहनधारकांना ३६० रुपयांचा मासिक पास घेता येणार आहे.

त्यामुळे दररोज या मार्गावरून ये-जा करणाऱ्या स्थानिक वाहनचालकांना प्रत्येक प्रवासासाठी स्वतंत्रपणे टोल भरण्याऐवजी मासिक पासचा पर्याय उपलब्ध होणार आहे. दरम्यान, लागू करण्यात आलेले हे सुधारित दर पूर्वीच्या दरांच्या तुलनेत नेमके किती वाढले किंवा कमी झाले आहेत, याबाबतची तुलनात्मक माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, १२ ऑगस्टपासून दोन्ही टोलनाक्यांवर सुधारित दरांची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now