तीन शाळांमध्ये आयोजन; विद्यार्थ्यांनी दिला अमली पदार्थमुक्त समाजाचा संदेश
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव पोलीस दलाच्या वतीने अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन राईज’ या महत्त्वपूर्ण मोहिमेंतर्गत भुसावळ शहरात अमली पदार्थ विरोधी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. १० ऑगस्ट रोजी झालेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भुसावळ शहरातील बियाणी मिलिटरी स्कूल, कमल गणपती हॉल आणि तापती पब्लिक स्कूल या तीन ठिकाणी ही स्पर्धा घेण्यात आली. ‘मिशन राईज’चे चार प्रमुख स्तंभ म्हणजे अमली पदार्थांना प्रतिबंध, इतरांना प्रेरणा, मिशन आधार आणि अमली पदार्थमुक्त समाज सशक्त करणे, या उपक्रमांचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनमानसात पोहोचविणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तसेच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भुसावळ उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवर आणि पोलिस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम तसेच व्यसनाधीनतेमुळे होणाऱ्या सामाजिक आणि वैयक्तिक नुकसानीबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही पोस्टरच्या माध्यमातून अमली पदार्थांविरोधात प्रभावी संदेश दिला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना ‘अमली पदार्थ विरोधी शपथ’ देण्यात आली. निरोगी आणि सुरक्षित समाजाच्या निर्मितीसाठी विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
जळगाव पोलीस दलाने या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांचे आभार मानत अमली पदार्थमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.











