चोपडा हादरले! जन्मदात्या बापाचा दोन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर

ऑगस्ट 2, 2026 10:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२६ । जळगावच्या चोपडा तालुक्यातील वडती गावात खळबळजनक घटना उघडकीस आलीय. जन्मदात्या बापाने झोपेत असलेल्या आपल्या दोन अल्पवयीन मुलांवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात 13 वर्षीय मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचा ११ वर्षांचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. मीरा सुभाष भिलाला असं मृत मुलीचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण चोपडा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

vadati

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संशयित आरोपी सुभाष गोपाळ भिलाला (वय 50) हा घटना घडल्यानंतर जंगलाच्या दिशेने फरार झाला होता. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शोधमोहीम राबवून काही वेळातच आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही मुले घरात झोपेत असताना त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. या हल्ल्यात मीरा भिलाला हिचा जागीच मृत्यू झाला तर तिचा 11 वर्षीय भाऊ रामु सुभाष भिलाला हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

ही धक्कादायक घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली असून या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून कौटुंबिक वाद, मानसिक स्थिती किंवा अन्य कोणत्या कारणातून ही घटना घडली का, याचा सर्व बाजूंनी तपास पोलीस करत आहेत.

घटनेनंतर वडती गावासह संपूर्ण परिसरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण पसरले आहे. अडावद पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुरावे संकलित केले असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण चोपडा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now