जळगाव लाईव्ह न्यूज । बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून शालकाने आपल्याच मेहुण्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. तोरणाळे शिवारातील जंगल परिसरात झालेल्या या हल्ल्यात मेहुणा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपीला जेरबंद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फत्तेपूर येथील सुभाषपुरा परिसरातील रहिवासी प्रशांत सुभाष चौधरी (वय २६) यांनी काही दिवसांपूर्वी वडगाव सहो येथील एका तरुणीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. या विवाहामुळे तरुणीचा भाऊ अभिषेक संतोष मोरे (वय १९) याच्या मनात प्रशांत यांच्याविषयी तीव्र संताप आणि सूडाची भावना निर्माण झाली होती.

२७ जुलै रोजी अभिषेकने प्रशांत यांना दुचाकीवरून तोरणाळे शिवारातील जंगल परिसरात नेले. तेथे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर अभिषेकने मोठा दगड उचलून प्रशांत यांच्या डोक्यावर वार केला. गंभीर जखमी होऊन ते बेशुद्ध पडताच ते मृत झाल्याचा समज करून आरोपीने त्यांच्या अंगावर झाडांचा पालापाचोळा टाकला आणि घटनास्थळावरून फरार झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशांत यांना तातडीने उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. याप्रकरणी प्रशांत यांच्या आई सरला नामदेव चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फत्तेपूर पोलीस ठाण्यात अभिषेक संतोष मोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचा शोध घेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंबी गावातून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहेम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव आणि त्यांच्या पथकाकडून सुरू आहे.आंतरजातीय विवाहाच्या वादातून घडलेल्या या घटनेमुळे जामनेर तालुक्यात खळबळ उडाली असून, परिसरात या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे.











