भुसावळातील माजी सैनिकाची १० लाखांची फसवणूक; सायबर ठगांनी असा लावला चुना?

जुलै 25, 2026 5:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस समोर येत असून अशातच व्हॉट्सअॅपवर स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवत भुसावळ तालुक्यातील एका माजी सैनिकाची तब्बल १० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

fraud jpg webp

भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील दामोदर राजधर चौधरी (वय ७०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २५ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२६ या कालावधीत संदीप शर्मा असे नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीने व्हॉट्सअॅपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला. संबंधित व्यक्तीने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगून विविध कारणांनी त्यांना घाबरवले तसेच विश्वास संपादन केला.

त्यानंतर आरोपीने वेगवेगळी कारणे पुढे करत आरटीजीएसद्वारे टप्प्याटप्प्याने १० लाख रुपये स्वतःच्या खात्यात जमा करून घेत माजी सैनिकाची आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणी २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत असून आरोपीचा शोध सुरू आहे.

दरम्यान, नागरिकांनी व्हॉट्सअॅपवरून स्वतःला पोलीस, सीबीआय, ईडी किंवा अन्य सरकारी अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. कोणतीही रक्कम पाठविण्यापूर्वी संबंधित माहितीची खातरजमा करावी आणि संशयास्पद कॉल किंवा संदेशांची त्वरित सायबर पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now