जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२६ । धरणगाव-जळगाव मार्गावरील श्री स्वामी समर्थ फ्लोअर मिलजवळ आज शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एसटी बस, आयशर आणि खडीने भरलेल्या ट्राला यांच्यात भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातून हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की धडकेचा आवाज दूरवर ऐकू गेला. धडकेनंतर खडीने भरलेला ट्राला रस्त्यावर पलटी झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.

शिरपूर आगाराची एमएच-२० बीएल-२७३६ क्रमांकाची एसटी बस जळगावहून शिरपूरकडे जात होती. त्याच मार्गावर खडीने भरलेला ट्राला धरणगावच्या दिशेने जात असताना, एमएच-१८ बीझेड-३२३२ क्रमांकाचा आयशर धरणगावहून जळगावकडे येत होता. श्री स्वामी समर्थ फ्लोअर मिलजवळ तिन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली.
अपघातानंतर जळगाव-धरणगाव मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्थानकाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी तत्परतेने कार्यवाही केली.
या मदतकार्यात पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर, सहाय्यक फौजदार संजय पाटील, हवालदार सत्यवान पवार, नितीन पाटील, संदीप पाटील आदींनी सहभाग घेतला. सुदैवाने, शेवटची माहिती मिळेपर्यंत या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे समोर आले आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याचा पुढील तपास धरणगाव पोलीस करीत आहेत.









