गडांवर स्वच्छता मोहीम; डॉ. सिसोदे आणि ‘वसुंधरा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम

जुलै 23, 2026 2:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आपला ऐतिहासिक वारसा केवळ पुस्तकात न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून त्याचे जतन कसे करावे, याचा एक अनोखा आदर्श बोदवड येथील न. ह. रांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास विषयाचे अभ्यासक डॉ. विश्वजीत भुजंगराव सिसोदे सर यांनी घालून दिला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे.

vasudhanra

डॉ. विश्वजीत सिसोदे हे सन २०१० पासून महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांना प्रत्यक्ष भेट देऊन इतिहास अभ्यासण्याचे कार्य करत आहेत. आजवर त्यांनी राज्यातील तब्बल ४८ किल्ल्यांचा सखोल अभ्यास केला आहे. केवळ अभ्यासावरच न थांबता, त्यांनी ‘वसुंधरा फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली असून, या माध्यमातून वृक्षारोपण, गड-किल्ल्यांची स्वच्छता आणि रक्तदान शिबिरांसारखे सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम ते सातत्याने राबवत असतात.

राजगड, तोरणा अन् वासोटा गडावर स्वच्छता मोहीम

या वर्षी डॉ. सिसोदे यांनी ‘दुर्गराज’ राजगड, तोरणा आणि वासोटा या ऐतिहासिक किल्ल्यांना भेट दिली. या मोहिमेदरम्यान किल्ल्यांच्या परिसरात पर्यटकांनी टाकलेला मानवनिर्मित कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. ऐतिहासिक वास्तूंचे सौंदर्य व पावित्र्य जपण्याचा संदेश त्यांनी या प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे.

सहकाऱ्यांचा सक्रिय सहभाग

या स्वच्छता मोहिमेत वसुंधरा फाउंडेशनचे सदस्य तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुनील पाटील, हाऊस ऑफ ज्वेल्सचे अंबादास सोनवणे, सामनेर येथील शाळेतील आदर्श शिक्षक गजानन नानोटे सर यांच्यासह अनेक सदस्यांनी हिरिरीने सहभाग नोंदवला.

इतिहासाचे रक्षण आणि निसर्गाचे संवर्धन कसे करावे, याचे मूर्तिमंत उदाहरण डॉ. सिसोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घालून दिले असून, या कार्यातून विद्यार्थ्यांना नक्कीच एक नवी प्रेरणा मिळत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now