जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२६ । सोलर प्रकल्पाच्या रिलीज ऑर्डरसाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या भुसावळ विभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. नितीन अभिमन्यू पाटील (वय 42) असं लाचखोर अभियंत्याचे नाव असून ही कारवाई आज बुधवार, २२ जुलै रोजी दुपारी तापी नगरातील चोपडा बिल्डींगजवळ करण्यात आली. या कारवाईमुळे महावितरण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावावर सोलर सिस्टीम बसविण्याची एजन्सी असून, त्या एजन्सीमार्फत दोन ग्राहकांकडे सोलर प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेली रिलीज ऑर्डर मंजूर करण्याची जबाबदारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांच्याकडे होती. ही प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी त्यांनी प्रत्येक प्रकरणामागे एक हजार रुपये, अशा एकूण दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

लाचेची मागणी होताच तक्रारदाराने जळगाव एसीबी कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. प्राथमिक पडताळणीत तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. नियोजनानुसार तक्रारदाराने आरोपीला ठरलेली रक्कम दिल्यानंतर पथकाने तत्काळ कारवाई करत नितीन पाटील यांना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या नितीन पाटील यांचा मासिक पगार तब्बल दोन लाख रुपये असताना, केवळ दोन हजारांच्या मोहात ते जाळ्यात अडकल्याने वीज कंपनी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे, ग्रेडेड पोलिस उपनिरीक्षक सुरेश पाटील, महिला हवालदार संगीता पवार, हवालदार बाळू मराठे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.












