जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव सुवर्णनगरीतील सराफ बाजारात सोने-चांदीच्या दरातील चढ-उतार कायम असून अवघ्या एका दिवसाच्या भाववाढीनंतर शुक्रवारी (१७ जुलै) दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती पुन्हा घसरल्या. विशेष म्हणजे, चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली असून एका दिवसातच चांदी ₹७ हजारांनी स्वस्त झाली आहे. त्याचवेळी सोन्याच्या दरातही ₹६०० ची घट झाली आहे.

गेल्या आठवडाभरापासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू होती. त्यानंतर गुरुवारी (१६ जुलै) चांदीच्या दरात ₹३ हजारांची वाढ होऊन प्रतिकिलो दर २ लाख २६ हजारांवर पोहोचला होता. मात्र, ही तेजी केवळ एक दिवसच टिकली.

शुक्रवारी (१७ जुलै) सराफ बाजारात चांदीच्या दरात थेट ₹७ हजारांची घसरण झाल्याने प्रतिकिलो दर २ लाख १९ हजारावर आला. तसेच सोन्याच्या दरातही ₹६०० ची घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या सोन्याचा दर प्रति तोळा १,४१,६०० रुपयांवर आला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक परिस्थितीचा परिणाम स्थानिक सराफ बाजारावर होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












