अडावद पोलिसांची मोठी कारवाई! अवैध हातभट्टी उद्ध्वस्त; १.५१ लाखांचा मुद्देमाल जागीच नष्ट

जुलै 18, 2026 8:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढरी शिवारात नाल्याच्या काठी अत्यंत छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर अडावद पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल १ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जागेवरच नष्ट केला. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

adavaddaru

गुप्त माहितीच्या आधारे धाड

पांढरी शिवारातील दुर्गम भागात गावठी हातभट्टीद्वारे दारू निर्मिती सुरू असल्याची गोपनीय माहिती अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाने सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान कैलास काशिनाथ कोळी (वय ३३, रा. इंदिरानगर प्लॉट, अडावद, ता. चोपडा) हा अवैध दारूभट्टी चालविताना आढळून आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करून संपूर्ण अड्डाच उद्ध्वस्त केला.

१.५१ लाखांचा मुद्देमाल नष्ट

कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे २ हजार लिटर गूळ-नवसागर मिश्रित रसायन भरलेले १२ प्लास्टिक ड्रम, हातभट्टीसाठी वापरले जाणारे साहित्य आणि ४० लिटर तयार गावठी दारू असा एकूण १ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा सर्व मुद्देमाल पंचांसमक्ष जागीच नष्ट करण्यात आला. या प्रकरणी पोलीस अंमलदार किरण रमेश शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून संशयित कैलास काशिनाथ कोळी याच्याविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी

ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत परीविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरे, सहाय्यक फौजदार जितेंद्र सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण शिरसाठ, शेषराव तोरे, भरत नाईक, पोलीस कॉन्स्टेबल भूषण राजेंद्र चव्हाण आणि प्रदीप पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now