जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२६ । मध्य पूर्वेतील अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधील जहाजांवर होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाऱ्याच्या वेगाने वाढत आहेत. मात्र, या आंतरराष्ट्रीय अनिश्चिततेच्या काळात सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत आज सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे.

आजच्या दरानुसार, १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ४१ हजार रुपये, तर एक किलो चांदीचा दर २ लाख २२ हजार रुपये इतका नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे, अवघ्या एका दिवसात सोन्याच्या दरात १ हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर गेल्या सात दिवसांत सोने तब्बल ५ हजार रुपये आणि चांदी १६ हजार रुपये स्वस्त झाली आहे.

सराफा व्यावसायिकांच्या मते, अमेरिका-इराणमधील वाढता तणाव, जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांची बदलती भूमिका यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सध्या सोन्या-चांदीचे दर अस्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बाजार विश्लेषकांच्या मते, युद्धजन्य परिस्थिती कायम राहिल्यास दरांमध्ये आणखी चढ-उतार होऊ शकतात. मात्र, जागतिक परिस्थिती स्थिर झाल्यानंतर सोन्याच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Goodreturns च्या आकडेवारीनुसार, आज २४ कॅरेट १ तोळे सोन्याच्या किमतीत ११० रुपयांची घट झाली असून, त्याचा भाव १ लाख ४२ हजार ८०० रुपये इतका आहे. चांदीच्या दरात आज कोणताही बदल झाला नसून १०० ग्रॅम चांदीचा दर २३ हजार ५०० रुपये इतकाच कायम आहे.
सणासुदीचा हंगाम आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात झालेली घसरण ग्राहकांसाठी खरेदीची संधी मानली जात असून, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीही हा काळ अनुकूल ठरू शकतो.











