जळगाव लाईव्ह न्यूज । पावसाळ्याची चाहूल लागताच जळगावचा निसर्ग जणू नटून-थटून तयार होऊ लागला आहे. पावसाळा म्हटलं म्हणजे सर्वत्र हिरवळ बघून आपसूकच फिरावंस वाटतं. परंतु, फिरायला जायचे कुठे हा मोठा प्रश्न असतो. आपला जळगाव जिल्हा आणि जवळपास फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाण आहेत. जी पावसाळ्यात पर्यटकांना पर्यटनासाठी विशेष आकर्षित करतात. जर तुम्ही या पावसाळ्यात वीकेंडला फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर जिल्ह्यातील या प्रमुख आणि लोकप्रिय स्थळांना नक्की भेट देऊ शकता: जिथे तुम्ही पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटू शकता.

अजिंठा लेणी (Ajanta Caves)
जागतिक वारसा स्थळ घोषित झालेली ही जगप्रसिद्ध लेणी जळगावपासून सुमारे ७७ किमी अंतरावर आहेत. येथील अप्रतिम बौद्ध शिल्पकला, प्राचीन भित्तिचित्रे आणि पावसाळ्यात सभोवताली निर्माण होणारा विहंगम निसर्ग पर्यटकांना भुरळ पाडतो.

श्री क्षेत्र पद्मालय –
जळगावपासून अवघ्या ३० किमी अंतरावर असलेले पद्मालय हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे स्थान भारतातील गणपतीच्या साडेतीन पीठांपैकी ‘अर्धे पीठ’ मानले जाते. येथील नैसर्गिक शांतता मनाला प्रसन्न करते.
उनपदेव गरम पाण्याचा झरा
सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी असलेला उनपदेव येथील नैसर्गिक गरम पाण्याचा झरा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. पावसाळ्यात सातपुड्याच्या हिरवाईत हे ठिकाण अधिकच सुंदर दिसते.
वाघूर डॅम :
वाघूर धरण हे जळगाव जिल्ह्यातील वराडशीम जवळ आहे. हे धरण सुद्धा त्याच्या जल साठ्यामुळे आणि निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटकांना अधिक आकर्षित करते. पावसाळ्यात मुख्यतः फिरण्यासाठी हे आकर्षक ठिकाण आहे.
मनुदेवी मंदिर आणि धबधबा
यावल तालुक्यातील सातपुड्याच्या घनदाट जंगलात वसलेले हे ठिकाण धार्मिक आणि निसर्ग पर्यटनाचा उत्तम नमुना आहे. येथील उंच कड्यावरून कोसळणारा धबधबा पावसाळ्यात ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींना आकर्षित करतो.
पाल (Pal)
जळगावपासून ३५ किमी अंतरावर सातपुड्याच्या कुशीत वसलेले ‘पाल’ हे जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. घनदाट जंगल, वाहणाऱ्या नद्या आणि आल्हाददायक वातावरणामुळे याला निसर्गप्रेमींची पहिली पसंती असते. येथे असलेल्या गारबर्डी धरणालाच सुकी धरण असेही म्हणतात. सातपुड्याच्या कुशीत वसलेले हे धरण पर्यटनासाठी उत्कृष्ट आहे.
श्रीक्षेत्र पाटणादेवी
चाळीसगाव जवळील पाटणादेवी हे ठिकाण इतिहास, अध्यात्म आणि निसर्गाचा त्रिवेणी संगम आहे. गौताळा अभयारण्याच्या परिसरात वसलेल्या या ठिकाणी आदिशक्ती चंडिका देवीचे पुरातन मंदिर आणि प्राचीन हेमाडपंती स्थापत्य पाहायला मिळते.
‘गोद्री’ येथील ‘डालकीची धार’
जामनेर तालुक्यातील गोद्री गावाजवळ अजिंठा पर्वतरांगांमध्ये वसलेला ‘डालकीची धार’ हा नयनरम्य धबधबा पावसाळ्यात पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरतो. सुमारे ३०० फूट उंचीवरून कोसळणारा फेसाळ जलप्रपात, सभोवतालची दाट हिरवाई आणि धुक्याने वेढलेले रमणीय वातावरण निसर्गप्रेमींना अक्षरशः भुरळ घालते.
गांधी तीर्थ (Gandhi Teerth)
जळगाव शहरातच जैन हिल्स परिसरात असलेले ‘गांधी तीर्थ’ हे एक जागतिक दर्जाचे भव्य संग्रहालय आणि संशोधन केंद्र आहे. महात्मा गांधी यांच्या जीवनप्रवासावर आधारित हे संग्रहालय प्रत्येकाने आवर्जून पाहावे असे आहे.
महर्षी कण्व आश्रम :
जळगाव मधील कानळदा येथे गिरणा नदीच्या किनाऱ्यावर असलेले हे महर्षी कण्व आश्रम. हिरवाईने वेढलेला आणि शांत परिसर पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. तिथे असलेली गुहा आणि बाग सुद्धा पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरते. तेथील सूर्यास्त पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. महाभारतात प्रसिद्ध असलेल्या महर्षी कण्व ऋषींचे आश्रम हे पर्यटनासाठी उत्तम आहे.
हतनूर डॅम :
हतनूर डॅम हे जळगाव जिल्ह्यातील एक धरण आहे. तेथे वसलेल्या हतनूर गावाच्या नावावरून हतनूर असे नाव धरणाला दिले गेले आहे. तेथील निसर्गरम्य परिसर विशेषतः पर्यटकांचे आकर्षण आहे.
रुद्रेश्वर
रुद्रेश्वर हे ठिकाण जळगाव जिल्ह्यातील नसले तरी जळगावच्या जवळच आहे. जवळपास २ तासांच्या अंतरावर असलेले हे अतिशय आकर्षक पर्यटन स्थळ आहे. येथे असलेल्या गुफा त्याचप्रमाणे धबधबा येथील विशेष आकर्षण आहे. याला रुद्रेश्वर लेणी किंवा मंदिर असंही संबोधलं जातं. अजिंठा लेणीपूर्वी रुद्रेश्वर लेणी कोरली असावी, असा काही संशोधकांचा अंदाज आहे.
वेताळवाडी किल्ला :
सोयगाव जवळील हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय सुंदर आहे. वेताळवाडी घाट आणि जलाशय देशील येथील आकर्षण आहे. घाटाच्या उजवीकडे किल्ला आहे. येथे एक जुनी तोफ देखील आढळते. हा एक डोंगरी किल्ला म्हणून ओळखला जातो. रुद्रेश्वर आणि वेताळवाडी किल्ला ही ठिकाणे ट्रॅकिंग साठी सुद्धा उत्तम आहेत.
पर्यटकांना आवाहन:
पावसाळ्यात या सर्व ठिकाणी निसर्गाचे अप्रतिम रूप पाहायला मिळते. मात्र, धबधबे आणि डोंगराळ भागात फिरताना पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.







