जळगावमार्गे धावणार मुंबई-नागपूर आणि नागपूर-नाशिक दरम्यान ‘विशेष अनारक्षित’ गाड्या!

जुलै 10, 2026 6:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । उर्स निमित्त वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई–नागपूर आणि नागपूर–नाशिक रोड या मार्गांवर विशेष अनारक्षित गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली असून, जळगाव आणि भुसावळसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. या विशेष गाड्यांमुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्या आणि आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार आहे.

train jpg webp

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ०१०२१ विशेष अनारक्षित गाडी ११ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे १२.३० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३.४५ वाजता नागपूर येथे पोहोचेल. परतीची ०१०२२ विशेष गाडी १२ जुलै रोजी रात्री ९.४० वाजता नागपूरहून सुटून १३ जुलै रोजी दुपारी १.५० वाजता मुंबई येथे पोहोचेल.

या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

याशिवाय ०१२०३ नागपूर–नाशिक रोड विशेष अनारक्षित गाडी १२ जुलै रोजी सायंकाळी ६.१५ वाजता नागपूरहून सुटून १३ जुलै रोजी पहाटे ५.३० वाजता नाशिक रोड येथे पोहोचेल. परतीची ०१२०४ गाडी १३ जुलै रोजी सकाळी ७.५० वाजता नाशिक रोडहून सुटून त्याच दिवशी रात्री ८ वाजता नागपूर येथे दाखल होईल.

या विशेष गाडीला अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव आणि मनमाड या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

रेल्वे प्रशासनाने या दोन्ही गाड्यांसाठी १८ डब्यांची रचना निश्चित केली असून त्यामध्ये १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह सामान्य डबे असतील. सर्व डबे अनारक्षित असल्याने सामान्य तिकिटावर प्रवास करता येणार आहे.

दरम्यान, प्रवाशांनी अनारक्षित तिकीट खरेदीसाठी रेलवन ॲपचा वापर करावा तसेच प्रवासापूर्वी गाडीचे अद्ययावत वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळ किंवा NTES ॲपवर तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. उर्स निमित्त वाढणारी गर्दी लक्षात घेता या विशेष गाड्यांमुळे हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now