जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावसह राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. श्रावण महिन्याची चाहूल लागताच बाजारात केळीच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे. सध्या केळीला प्रति क्विंटल २,५०० ते ३,२०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काही महिन्यांपूर्वी केळीला अवघा ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच उष्णतेचा फटका आणि निर्यातीवरील परिणामामुळे शेतकरी संकटात सापडला होता. मात्र आता बाजारातील वाढती मागणी आणि मर्यादित पुरवठ्यामुळे दरात लक्षणीय सुधारणा झाली आहे.

व्यापारी सूत्रांच्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश या प्रमुख केळी उत्पादक राज्यांतून अपेक्षित प्रमाणात आवक होत नसल्याने देशांतर्गत बाजारात पुरवठा कमी झाला आहे. दुसरीकडे इतर फळांची उपलब्धताही मर्यादित असल्याने ग्राहकांचा कल केळीकडे वाढला आहे. त्यामुळे दर्जेदार केळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुढील काही दिवसांत श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. या काळात उपवास, धार्मिक विधी आणि मंदिरांमध्ये नैवेद्यासाठी केळीची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे येत्या काळात केळीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
केळी उत्पादक शेतकऱ्यांनीही सध्याच्या दरवाढीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आगामी काही आठवडे बाजारभाव टिकून राहिल्यास आर्थिक नुकसान भरून काढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.







