जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा तालुक्यात चार वर्षांपूर्वी नवजात बालकाला नाल्यात टाकून देण्याच्या धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या प्रकरणात अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. आरोपी जन्मदात्या मातेला न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश छाया पाटील यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

ही घटना ६ ऑगस्ट २०२२ रोजी चोपडा तालुक्यातील एका गावात घडली होती. गावात उत्तरकार्याचा कार्यक्रम सुरू असताना काही ग्रामस्थांना नाल्याजवळ नवजात बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिस पाटलांना दिली. पोलिस पाटील घटनास्थळी पोहोचले आणि कापडात गुंडाळलेल्या अवस्थेतील बालकाला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

या घटनेनंतर चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावातील नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलांची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी कोणतीही अधिकृत नोंदणी नसताना एका महिलेची नुकतीच प्रसूती झाल्याचा संशय आल्याने तिची चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान संबंधित महिलेने नवजात बालकाला नाल्यात फेकून दिल्याची कबुली दिल्यानंतर तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणाची सुनावणी अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. किशोर बागूल यांनी पोलिस पाटील, आशा सेविका, डॉक्टर यांच्या साक्षी तसेच डीएनए अहवालासह भक्कम पुरावे न्यायालयासमोर सादर केले. या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी महिलेला तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.











