डांबरीकरण की निव्वळ काळा रंग? दीपनगरमधील निकृष्ट रस्त्यामुळे नागरिकांचा तीव्र संताप!

जुलै 9, 2026 3:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ तालुक्यातील दीपनगर प्रशासन अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमधील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बैठक हॉल ते रेल्वे गेट दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणात कंत्राटदाराने थेट निकषांना हरताळ फासला असून, या विरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

dipnagarroad

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दीपनगर प्रशासनाच्या माध्यमातून स्थानिक शेतकरी आणि वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बैठक हॉल ते रेल्वे गेट दरम्यान रस्त्याच्या डामरीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, कंत्राटदाराकडून या कामात अत्यंत निष्काळजीपणा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्त्यावर नियमानुसार आवश्यक असलेला किमान दोन इंचाचा डामराचा थर देणे बंधनकारक असताना, प्रत्यक्ष जागेवर मात्र केवळ नावापुरता डांबराचा पातळ थर मारून प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे

या निकृष्ट कामाची तक्रार मिळताच स्थानिक ग्रामपंचायत सदस्य सचिन शशिकांत पाटील यांनी तात्काळ प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. डांबरीकरण झालेल्या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय आहे की, सचिन पाटील यांनी हाताने रस्त्यावरील डामर सहज उखडून दाखवले. या रस्त्याखाली कोणत्याही प्रकारचे मजबूत खडीकरण केलेले नाही की डांबर व खडीचे योग्य मिश्रण वापरलेले नाही. अत्यंत ठिसूळ पद्धतीने वरवर केलेल्या या डामरीकरणामुळे पहिल्याच पावसात किंवा अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे हा रस्ता वाहून जाईल, अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

“शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी येणारा शासकीय निधी अशा प्रकारे कंत्राटदाराच्या घशात घातला जात असेल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही. हे डामरीकरण नसून केवळ काळा रंग मारून जनतेच्या डोळ्यात धूळफेक सुरू आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्य सचिन शशिकांत पाटील यांनी दिलीय.
— सचिन शशिकांत पाटील (सदस्य, ग्रामपंचायत)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now