जळगावात सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी स्वस्त; आताचे दर काय?

जुलै 7, 2026 4:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२६ । जळगाव शहरातील सुवर्णबाजार पेठेत सलग दुसऱ्या दिवशी सोन्यासह चांदी दरात घसरण झाली. या दोन दिवसांत सोने २०६० तर चांदी ४१२० रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

gold

जागतिक आर्थिक घडामोडी, अमेरिकेची मध्यवर्ती बँक ‘यूएस फेडरल रिझर्व्ह’च्या आगामी धोरणात्मक निर्णयांबाबतची अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार यामुळे देशांतर्गत सराफा बाजारात अस्थिरतेचे वातावरण कायम आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या किमती कमी होत्या, मात्र पहिल्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावामुळे त्यात मोठी वाढ झाली होती. आता पुन्हा एकदा बाजारात नफा वसुली डॉलरमधील चढ-उतार आणि जागतिक गुंतवणूकदारांच्या सावध भूमिकेमुळे सोन्या-चांदीच्या किमती नरमल्या आहेत.

आज मंगळवारी सकाळी जळगाव सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात ७२१ रुपयांची घट होऊन तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅमचा भाव १,४९,०४१ रुपये झाला. सोमवारी दिवसभरात सोन्याच्या दरात तब्बल १३३९ रुपयांची घट झाली होती. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर ३ टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४९,७६२ रुपयांपर्यंत खाली आले होते. यामुळे गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात २,०६० रुपयांची घट नोंदविण्यात आली.

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही लक्षणीय नरमाई दिसून आली आहे. सोमवारी चांदीच्या दरात १०३० रुपयांची घट होऊन ३ टक्के जीएसटीसह चांदी प्रति किलो २,४३,०८० रुपयांवर आली होती. मंगळवारी सकाळी यात तब्बल ३०९० रुपयांची मोठी घसरण झाली. त्यामुळे चांदी आता जीएसटीसह प्रति किलो २,३९,९९० रुपयांपर्यंत खाली आली आहे. दोन दिवसांत चांदी तब्बल ४१२० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

सोन्या-चांदीच्या दरातील या घसरणीमुळे ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आगामी सणासुदीच्या काळात खरेदीला वेग येण्याची अपेक्षा सराफा व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now