जळगाव लाईव्ह न्यूज । जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या महिलेवरील अत्याचार प्रकरणात अटक केलेल्या १४ पैकी ११ आरोपींना आज जामनेर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व आरोपींना ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तीन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना बाल न्याय मंडळासमोर (बाल न्यायालय) हजर करण्यात येणार आहे. दरम्यान या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी अशपाक तडवी हा अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगल परिसरात एक महिला तिच्या मित्रासोबत थांबली असताना संशयित आरोपींनी दोघांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यानंतर दोघा आरोपींनी महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला, तर अन्य दोघांनी या कृत्याचे मोबाईलद्वारे चित्रीकरण केले. त्यानंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर २९ जून रोजी या धक्कादायक घटनेची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत १५ संशयितांपैकी १४ जणांना अटक केली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी अशपाक तडवी मात्र गुन्हा घडल्यापासून फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, फरार आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या अमानुष घटनेमुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.








