कजगावजवळ भाविकांच्या ट्रॅक्टरला आयशरची जोरदार धडक; एकाचा मृत्यू, १५ जखमी

जून 30, 2026 10:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२६ । भडगाव तालुक्यातील कजगावजवळ मध्यरात्री भीषण अपघात होऊन एका भाविकाचा मृत्यू झाला, तर दोन महिलांसह १५ जण गंभीर जखमी झाले. पंढरपूर वारीसाठी गेलेल्या नातेवाईकांना सोडून ट्रॅक्टरने घरी परतत असताना मालवाहू आयशरने दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरचे अक्षरशः दोन तुकडे झाले.

kajgaonacd

मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी काही भाविक ट्रॅक्टरने गेले होते. नातेवाईकांना सोडल्यानंतर सर्व जण मध्यरात्री ट्रॅक्टरने घरी परतत होते. रात्री १ वाजेच्या सुमारास भडगाव तालुक्यातील कजगाव परिसरात आले असता, समोरून येणाऱ्या एका मालवाहू आयशर वाहनाने ट्रॅक्टरला अत्यंत भीषण धडक दिली.

अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळाकडे धावले. धडकेच्या तीव्रतेमुळे ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले होते आणि ट्रॅक्टरमधील भाविक महामार्गावर फेकले गेले होते. या अपघातात एका भाविकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर ट्रॅक्टरमधील इतर १५ प्रवासी गंभीर जखमी झाले, ज्यात दोन महिलांचाही समावेश आहे.

अपघात घडताच कजगाव परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी रात्रीची वेळ असूनही अत्यंत तत्परता दाखवली. ग्रामस्थांनी तातडीने बचावकार्य सुरू करत सर्व जखमींना ट्रॅक्टरखालून आणि रस्त्यावरून बाजूला काढले. रुग्णवाहिका आणि वाहनांची व्यवस्था करून सर्व १५ जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर सध्या युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत.

या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून, पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या कुटुंबावर या अपघातामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now