जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या आठवड्यात सलग पाच दिवस घसरण अनुभवल्यानंतर, जळगावच्या सुवर्णनगरीत सोने आणि चांदीच्या भावात गेल्या २४ तासांत जोरदार वाढ झाली आहे. चांदीच्या दरात तब्बल ५ हजार रुपयांची मोठी वाढ होऊन ती २ लाख ४२ हजार रुपयांवर पोहोचली आहे. तर सोन्याच्या भावातही १ हजार २०० रुपयांची वाढ झाल्याने सोने १ लाख ४७ हजार रुपयांवर (प्रति तोळा) पोहोचले आहे. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण आहे.

१६ जूनपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण पाहायला मिळत होती. घसरगुंडीचा हा आलेख २० जूनपर्यंत सुरूच होता. २० जून रोजी चांदी घसरून २ लाख ३७ हजार रुपयांवर आली होती. त्यानंतर रविवारी (२१ जून) बाजार बंद असल्याने हे भाव स्थिर राहिले. मात्र, काल सोमवार उजाडताच (२२ जून) बाजारात मोठी तेजी आली आणि चांदीच्या भावाने एकाच दिवसात ५ हजार रुपयांची झेप घेत २ लाख ४२ हजार रुपये प्रतिकिलोचा टप्पा गाठला.

सोने-चांदीचे ताजे दर
चांदी (प्रतिकिलो): ₹ २,४२,००० (५,००० रुपयांची वाढ)
सोने (प्रति तोळा): ₹ १,४७,००० (१,२०० रुपयांची वाढ)
गेल्या आठवड्यातील घसरणीमुळे ज्या ग्राहकांनी खरेदीचे नियोजन केले होते, त्यांना या नव्या दरवाढीमुळे आता अधिक खिसा रिकामा करावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे स्थानिक पातळीवर ही दरवाढ झाल्याचे बोलले जात आहे.












