जळगाव लाईव्ह न्यूज | गैरप्रकारामुळे रद्द करण्यात आलेल्या परीक्षेची फेरपरीक्षा रविवारी जळगाव जिल्ह्यासह देशभरात कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणि शांततेत सुरू झाली. जळगाव जिल्ह्यातील १२ परीक्षा केंद्रांवर एकूण ४ हजार ७१६ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात असून प्रशासनाने पारदर्शक आणि सुरळीत परीक्षा प्रक्रियेसाठी व्यापक नियोजन केले आहे.

यापूर्वी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेला बसावे लागत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र, फेरपरीक्षा कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दुपारी १.३० वाजेपर्यंतच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेआधीच परीक्षा केंद्रांवर हजेरी लावली.
राज्याच्या विविध भागांतून जळगावात येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे स्थानक व बसस्थानक परिसरात विशेष मदत केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर ओळखपत्रांची कसून पडताळणी करूनच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे.
दरम्यान, सर्व परीक्षा केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क आहे. परीक्षा शांत, सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यावर प्रशासनाचा भर असून संपूर्ण प्रक्रियेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष आहे.











