जळगाव पोलिसांची सर्वात मोठी कारवाई! ५ गावांवर पहाटे छापा, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

जून 19, 2026 3:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२६ । सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना दुर्मिळ वस्तूंचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. आज, १९ जून २०२६ रोजी पहाटे मुक्ताईनगर तालुक्यातील पाच गावांमध्ये ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ ही धडक मोहीम राबवित या कारवाईत पोलिसांनी कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करत सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने गुन्हेगारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

muktainagar police action

मुक्ताईनगरातील हलखेडा, मथपुरी, लालगोटा, जोंधनखेडा आणि चारठाणा या गावांमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, या परिसरात सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना आमिष दाखवून बनावट वस्तू, नकली नोटा किंवा खोट्या मौल्यवान वस्तूंच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम आखून पोलिसांनी मोठी कारवाई केली.

या संपूर्ण कारवाईत जळगाव पोलिसांनी एकूण २० लाख रुपयांची रोख रक्कम, ३०० ग्रॅम वजनाचे अंदाजे ३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, ४ किलो वजनाचे अंदाजे ८ लाख रुपयांचे चांदीचे दागिने, दोन गावठी कट्टे, ३ जिवंत कारतुसे, वन्यजीवांची कातडी, ४ चारचाकी वाहने, ६ दुचाकी वाहने आणि ३० मोबाईल फोन असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे परिसरात कायद्याचा धाक निर्माण झाला असून गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

या’ सराईत गुन्हेगारांना मुद्देमालांसह ठोकल्या बेड्या:
१. फरेज राजु पवार (वय ४०, रा. मधापुरी) – लोखंडी रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतुसासह अटक.
२. रामजाने राईसाहेब भोसले (वय ३२, रा. हलखेडा) – लोखंडी पिस्टल, २ काडतुसे आणि नकली नोटांसह अटक.
३. आक्काबाई जोगिंदर भोसले (वय ३२, रा. हलखेडा) – ६.४२ लाख रोख, १७ मोबाईल आणि ३६ लाखांच्या सोन्या-चांदीसह अटक.
४. रोहित सुदेश पवार (वय ३२, रा. मधापुरी) – १४ लाख रोख आणि २ लाखांच्या दागिन्यांसह अटक.
५. राजकिसन भोसले, दया भोसले, शिवकिसन भोसले, जोगिंदर भोसले – भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल.
६. गांझी दरियासिंग भोसले – वन्य प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत कातड्यांची तस्करी करताना अटक.
७. विलास नरविलाल पवार आणि अजय दादा पवार (दोघे रा. हलखेडा) – जुन्या गंभीर गुन्ह्यांत फरार असलेले दोन्ही सराईत आरोपी अटकेत.

दरम्यान, मागील तीन वर्षांत या परिसरात दरोडे, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, फसवणूक आणि सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद झाल्याने ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ तथा मुक्ताईनगरचे प्रभारी केदार बारवोले, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव), महेश गायकवाड (भुसावळ शहर), निलेश गायकवाड (भुसावळ तालुका), राहुल वाघ, आशीष लव्हांगळे (बोदवड), विशाल पाटील (सावदा), योगिता नारखेडे (नशिराबाद), मीरा देशमुख (निंभोरा) तसेच अमित कुमार बागुल (वरणगाव) यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि सुमारे २०० पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now