जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२६ । अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या शांतता करारानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह भारतीय सराफा बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक करारामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी पडझड झाली असून, आज शुक्रवारी जळगावच्या सुवर्णपेठेत बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड घसरण नोंदवली गेली. चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल १० हजार रुपयांची, तर २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ३,६५० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे ऐन लग्नसराईच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. Gold Silver Rate Today

सोन्याचा दर
GoodReturns ने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या तिन्ही प्रकारांमध्ये (२४, २२ आणि १८ कॅरेट) मोठी घसरण झाली. जळगाव सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत ३६५० रुपयांनी घसरण झाली आहे. यानंतर हा दर १,४५,८६० रुपयावर पोहोचला आहे. तसेच २२ कॅरेट सोन्याच्या कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत ३३५० रुपयांनी घसरून १,३३,७०० रुपयावर पोहोचला आहे. तर १८ कॅरेट सोन्याच्या १ तोळ्याच्या किंमतीत २७४० रुपयांनी घसरण झाली आहे. यानंतर हा दर १०९३९० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला.

चांदीचा दर
सोन्यापाठोपाठ आज चांदीच्या दरालाही मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून उच्चांकी पातळीवर असलेल्या चांदीच्या दरात आज एकाच दिवसात प्रति किलो १०,००० रुपयांची घसरण झाली. या मोठ्या पडझडीनंतर जळगाव सराफा बाजारात चांदीचा दर २,५०,००० रुपये प्रति किलोवर स्थिरावला आहे.
जागतिक पातळीवर अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळल्याने आणि शांतता करार झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीतील सुरक्षित गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, जागतिक बाजारासह जळगावच्या सुवर्णनगरीतही दरांमध्ये ही मोठी घसरण पाहायला मिळत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या अचानक झालेल्या दरकपातीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून दरवाढीचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य खरेदीदारांना आणि लग्नकार्यासाठी दागिने घडवणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.












