जळगाव लाईव्ह न्यूज । मुंबईतील वर्सोवा भागात एका हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरून खाली पडल्याने जळगावच्या एका तरुण हॉटेल व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. पवन सुनील पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, हा मृत्यू घातपात आहे की आत्महत्या, याबाबत अद्याप संभ्रम असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

पवन पाटील हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील नशिराबादचा रहिवासी होता. त्याचे वडील रेमंड कंपनीत कार्यरत होते. वडिलांच्या निधनानंतर पवन हा त्याच्या आईसह जळगाव शहरातील अयोध्यानगर भागात वास्तव्यास होता. त्याच्या पश्चात आई आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. तरुण मुलाच्या अचानक जाण्याने अयोध्यानगर परिसरावर शोककळा पसरली आहे.

गेल्या काही वर्षांपासून पवन हा मुंबईत हॉटेल व्यवसायात स्थिरावला होता. वर्सोवा येथील एका हॉटेलमधून तो आपला व्यवसाय सांभाळत होता. गुरुवारी सकाळी ११ वाजता तो हॉटेलच्या ६व्या मजल्यावरून खाली कोसळला. अत्यंत उंचावरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.पवनच्या मृत्यूची बातमी जळगावातील ‘हॉटेल गौरव’चे संचालक आणि पवनचे काका योगेश पाटील यांना कळवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच ते कुटुंबीयांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत.
मृत्यूचे कारण अस्पष्ट
पवनच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली की यात काही घातपाताचा प्रकार आहे, याबाबत वर्सोवा पोलीस अधिक तपास करत आहेत. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून पोलीस सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.










