‘एल निनो’चा प्रभाव मान्सूननंतरही कायम राहणार; IMDच्या नव्या अंदाजाने चिंता वाढली

जून 15, 2026 5:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । देशावर सध्या ‘एल निनो’चे महासंकट घोंगावत असून, यामुळेच यंदा मान्सून देशात आणि महाराष्ट्रात अत्यंत उशिराने दाखल झाला आहे. मान्सूनचे आगमन झाले असले तरी अद्याप मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. अशा बिकट परिस्थितीत आता भारतीय हवामान विभागाने (IMD) ‘एल निनो’बाबत एक अत्यंत चिंताजनक आणि नवा अंदाज वर्तवला आहे. जूनच्या सुरुवातीला प्रशांत महासागरात सक्रिय झालेला एल निनो मान्सून संपल्यानंतरही देशावर आपला प्रभाव कायम ठेवणार आहे.

el nino

भारतीय हवामान विभागाचे (IMD) प्रमुख डॉ. मृत्यूंजय महापात्र यांच्या मतानुसार जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या सुरुवातीच्या काही दिवसात एल निनोचा प्रभाव मध्यम स्वरुपाचा राहील. त्यानंतर एल निनोचा प्रभाव वाढत जाईल विशेष म्हणजे, यंदा या जागतिक हवामान बदलाचा फटका केवळ मान्सून काळापुरता मर्यादित नसून, मान्सून संपल्यानंतरही एल निनोचा प्रभाव कायम राहील. यामुळे आगामी काळात पावसाचे प्रमाण आणखी घटण्याची आणि हिवाळ्यातही याचे विपरित परिणाम जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे.

राज्यात पावसाने अद्याप जोर धरलेला नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. “शेतकऱ्यांनी कोणतीही घाई न करता चांगल्या आणि पुरेशा पावसाची वाट पाहावी. घाईघाईत पेरणी केल्यास बियाणे वाया जाऊन ‘दुबार पेरणी’चे मोठे संकट ओढवू शकते,” असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. दुबार पेरणीचा आर्थिक फटका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि सरकारकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हवामान विभागाचे प्रमुख डॉ. महापात्र यांनी संभाव्य संकटाची जाणीव करून देतानाच नागरिकांना धीरही दिला आहे. “एल निनोचा अंदाज चिंताजनक असला तरी नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. या हवामान संकटाचा आणि संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी शासकीय पातळीवर युद्धपातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. जलसंपदा आणि कृषी विभागामार्फत पाण्याचे नियोजन आणि आपत्कालीन कृती आराखडा तयार केला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now