जळगावात DAP खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली; कृषी विभागाकडून ‘हा’ पर्याय वापरण्याचा सल्ला

मे 29, 2026 1:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे खरीप हंगामाची लगबग सुरू असतानाच जळगाव जिल्ह्यात ‘डीएपी’ (DAP) खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बाजारात डीएपी खताची मागणी वाढलेली असताना पुरवठा मात्र मर्यादित होत आहे. या पार्श्वभूमीवर, कृषी विभागाने शेतकऱ्यांना केवळ डीएपीवर अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या इतर पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

dap fertilizer rate

यंदा बदलत्या हवामानामुळे आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी आधीच सावध झाले असून, खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी मोठ्या प्रमाणात खतांची खरेदी करत आहेत. कापूस, मका यांसारख्या पिकांसाठी जिल्ह्यात डीएपी खताला सर्वाधिक मागणी असते. मात्र, पुरवठ्याअभावी बाजारात तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना खतासाठी कृषी केंद्र आणि दुकानांमध्ये भटकंती करावी लागत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात १८ हजार मेट्रिक टन खतांची मागणी होती, मात्र इराण-अमेरिकेच्या युद्धामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात डीएपी मिळणे कठीण आहे. याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना केवळ डीएपी खतावर अवलंबून न राहता एसएसपी, टीएसपी तसेच संयुक्त खतांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. ही खते पिकांसाठी प्रभावी असून जमिनीतील पोषणमूल्य टिकवण्यासाठीही उपयुक्त असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्यांना इशारा

दरम्यान, डीएपीच्या तुटवड्याचा गैरफायदा घेऊन काही विक्रेत्यांकडून खतांचा कृत्रिम तुटवडा किंवा जादा दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर प्रशासनाने कडक पावले उचलली असून, जिल्ह्यातील खत विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारचा कृत्रिम तुटवडा निर्माण करू नये आणि शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक टाळावी, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now