जळगाव लाईव्ह न्यूज | महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली असून जळगाव जिल्ह्यातील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. १८ जून २०२६ रोजी मतदान आणि २२ जून रोजी मतमोजणी होणार असल्याने जिल्ह्यात तात्काळ आचारसंहिता लागू झाली आहे. विधान परिषदेचे माजी आमदार चंदूभाई पटेल यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रिक्त झालेल्या या जागेवर वर्णी लागण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

संख्याबळाचा विचार करता या निवडणुकीत महायुतीचे स्पष्ट आणि निर्णायक बहुमत असले, तरी जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत रस्सीखेच दिसून येत आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती अस्तित्वात नसल्यामुळे केवळ नवनियुक्त नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष हेच मतदार असणार आहेत. सर्वानुमते निर्णय घेऊन महायुती एकच उमेदवार देईल, असा दावा नेत्यांकडून केला जात असला तरी दोन्ही बाजूंकडून मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे.

भाजपाकडून इच्छुकांची भाऊगर्दी
भाजपाकडून या जागेवर पारंपरिक हक्क सांगत अनेक नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपच्या गोटातून नंदकुमार अडवाणी, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन आणि अमोल शिंदे यांच्या नावांची चर्चा सुरू होती. त्यातच आता माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांचेही नाव इच्छुक उमेदवार म्हणून समोर आल्याने भाजपमधील अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.
प्रतापराव पाटील यांच्यामुळे शिवसेनेचे पारडे जड
दुसऱ्या बाजूला, जळगाव जिल्ह्यात गेल्या काही काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जिल्ह्यातील ही वाढती संघटनशक्ती पाहता ही जागा आपल्याच पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे गटाने कंबर कसली आहे. शिवसेनेतर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. शिवसेनेने यापूर्वी या मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवली आहे, त्यामुळे ‘तिसऱ्यांदा शिवसेना’ असा नारा देत प्रतापराव पाटील यांच्यासारख्या प्रबळ चेहऱ्यामुळे शिवसेनेचे पारडे तूर्तास जड दिसत असून भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
महायुतीकडे निर्णायक बहुमत
नगरपालिका / नगरपरिषदा / नगरपंचायती (एकूण ४८२ जागा) : भा.ज.पा. – १७१, शिवसेना – १२०, राष्ट्रवादी (श.प.) – २४, राष्ट्रवादी – ३३, शिवसेना (उ.बा.ठा.) – ३, एम आय एम – ३, काँग्रेस – २१, महाराष्ट्र जन विकास आघाडी – १५, धरणगांव शहर विकास आघाडी – ९, अमळनेर तालुका शहर विकास आघाडी – १२, शहर विकास आघाडी – १०, शिरीषदादा चौधीर मित्र परिवार आघाडी – २, जन आधार विकास पार्टी – ३, सुराज्य परिवर्तन – २, अपक्ष – ५४ असे एकूण ४८२ नगरसेवक आहेत. तर जळगाव महानरपालिकेतील एक ७५ नगरसेवकांपैकी भा.ज.पा. – ४६, शिवसेना – २२, शिवसेना (उ.बा.ठा.) – ५, राष्ट्रवादी – १, अपक्ष – १ असे पक्षीय बलाबल आहे.
आघाड्या व अपक्षांची गोळाबेरीज ठरणार निर्णायक
एकूण संख्याबळात महायुतीचे पारडे जड असले, तरी महायुतीमधील तिसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नगरसेवकांची भूमिका या निवडणुकीत ‘किंगमेकर’ ठरू शकते. यात महाराष्ट्र जन विकास आघाडी, धरणगांव शहर विकास आघाडी , अमळनेर तालुका शहर विकास आघाडी , शहर विकास आघाडी, शिरीषदादा चौधीर मित्र परिवार आघाडी यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवारांशी मंत्री गुलाबराव पाटील यांचे चांगले संबंध आहेत. यामुळे या सर्वांची गोळाबेरीज निर्णायक ठरु शकते.









