जळगावात सूर्यदेव कोपले! पारा ४३ अंशांच्या पार, आगामी दोन-तीन दिवस महत्वाचे..

एप्रिल 25, 2026 10:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२६ । जळगाव जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली असून गेल्या २४ तासाच जळगावचे कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने जळगावकर अक्षरशः होरपळून निघाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून, दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

TP25

शुक्रवारी (२४ एप्रिल) तापमानात १.३ अंशाने वाढ होऊन जळगावचा पारा ४३.३ अंशावर पोहचला. कॅलेंडरनुसार आता एप्रिल महिना सुरू असला तरी, जळगावकरांना मात्र मे महिन्यातील भीषण उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने आगामी दोन-तीन दिवसांत तापमान ४५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

सामान्यतः मे महिन्यात जाणवणारी उन्हाची तीव्रता यंदा एप्रिलच्या उत्तरार्धातच अनुभवायला मिळत आहे. राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या प्रवाहामुळे उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा झपाट्याने वाढत आहे. वैशाख महिना सुरू होण्यापूर्वीच जळगावने चाळीशी ओलांडली असून, आता जिल्हा ४५ अंशांच्या उंबरठ्यावर उभा आहे.

रस्त्यांवर शुकशुकाट, जनजीवन विस्कळीत

वाढत्या उष्णतेचा मोठा परिणाम जनजीवनावर झाला आहे. सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका बसत आहे. दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत उन्हाच्या झळा इतक्या तीव्र आहेत की, शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उष्णतेपासून बचावासाठी नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून, अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणारे नागरिक छत्री, टोपी आणि रुमालाचा आधार घेताना दिसत आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार तापमानात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता असून पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जळगावात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचे संकेत असून येणारे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now