Yawal : कर्तव्यावरून परतणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा भीषण अपघातात मृत्यू

एप्रिल 21, 2026 11:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना वाढताना दिसत असून अशातच भरधाव मोटारीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात यावल पोलीस ठाण्यातील कार्यरत पोलीस कर्मचारी भरत कोळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bharat koli

मिळालेल्या माहितीनुसार, भरत कोळी हे रविवारी रात्री यावल पोलीस ठाण्यात आपले कर्तव्य बजावून दुचाकीने किनगावमार्गे आपल्या राहत्या गावी विदगाव (ता. जळगाव) कडे परतत होते. यावल-किनगाव रस्त्यावरील हॉटेल मनमंदिर जवळ आले असता, मागून येणाऱ्या एका भरधाव प्रवासी मोटारीने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. या धडकेत कोळी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

याप्रकरणी प्रवीण कोळी यांच्या तक्रारीवरून मोटार चालक दीपक प्रकाश सपकाळे (रा. आडगाव) याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक किशोर परदेशी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सोमवारी दुपारी विदगाव येथे पोलीस कर्मचारी भरत कोळी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, अनिल बडगुजर, यावलचे निरीक्षक रंगनाथ धारबळे आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा मुख्यालयातील मानवंदना पथकाने हवेत फैरी झाडून कोळी यांना अखेरची सलामी दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now